आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्यांची एसटी आता फेसबुकवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - स्पर्धेत टिकण्याबरोबरच प्रवाशांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी एसटीकडूनही उपाययोजनांचा प्रयोग केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून एसटीने फेसबुकवर पेज निर्माण केले आहे. प्रवाशांच्या सूचना, तक्रारींची दखल घेणे व एसटीच्या विविध सवलती, उपक्रमाची माहिती याद्वारे देण्यास प्रारंभ केला आहे.

वर्षभरात एसटी व्यवस्थापनाने कात टाकण्यास प्रारंभ केला आहे. लाल डब्याच्या ठिकाणी निमआराम, परिवर्तन, शीतल, व्हॉल्व्हो, यशवंती अशा विविध र्शेणीतील बस दाखल झाल्यानंतर बसस्थानक अद्ययावत करण्यावर महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच राज्यातील अनेक बसस्थानक आजच्या परिस्थितीत कॉर्पोरेट साज चढवून थाटात उभे आहेत. अनेकांचे काम प्रगतिपथावर आहे. मुबलक प्रमाणात सोयी, सुविधा पुरवूनही याबाबत आवश्यक ती माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचत नव्हती. सुविधांची माहिती वर्तमानपत्र, संकेतस्थळाबरोबरच आता फेसबुकवरही मिळणार आहे.


9 दिवसांत 4500 लाइक्स
एसटी महामंडळाच्या फेसबुक अकाउंटला 2 सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात आला आहे. www.facebook.com/msrtc.in या अकाउंटवर महामंडळातील महत्त्वाचे दूरध्वनी, पासच्या किमती, विविध कार्यक्रमांची छायाचित्रे, प्रवासी योजनांची माहिती देण्यात आली आहे. या अकाउंटला गेल्या नऊ दिवसांत जवळपास साडेचार हजार लाइक्सबरोबरच अनेक सूचना, तक्रारी व उपक्रमाचे कौतुक करणार्‍या कॉमेंट्स प्राप्त झाल्या आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी
प्रवाशांनी फेसबुकवरील www.facebook.com/msrtc.in
या अधिकृत पृष्ठाद्वारेच एसटी महामंडळाशी संवाद साधावा. भविष्यात एसटीतर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे.’’ दीपक कपूर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ