आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Congress Not Wining Election Narendra Modi, Divya Marathi

यापुढे काँग्रेस पक्ष जिंकण्याची शक्यता नाही, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - ‘बंधू-भगिनींनो, काँग्रेस यानंतर जिंकण्याची शक्यताच नाही, काँग्रेस जिंकेल असे कोणी सांगणारही नाही. काँग्रेस आपल्या पापांमुळे मरत आहे. देशाच्या जनतेने काँग्रेसला काय दिले नाही? ६० वर्षांची सत्ता दिली आहे. गरिबीच्या नावावर काँग्रेसला सत्ता मिळाली, परंतु गरिबांचे कधीही भले केले नाही,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला.

येथील तापडिया इस्टेटच्या मैदानावर भाजप व मित्रपक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा घेण्यात आली. दुपारी १.५१ मिनिटांनी मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली, ती मराठीतूनच. ‘मंचावर उपस्थित....’ हे शब्द मराठीतून उच्चारताच उपस्थितांनी ‘मोदी...मोदी...’चा गजर करून एकच जल्लोष केला. त्यानंतर मोदी यांनी आपल्या सुमारे ११ मिनिटांच्या भाषणात विरोधकांना चांगलेच झोडपून काढले. १५ तारखेला आपण मतदान करण्यासाठी जाणार आहात. त्या दिवशी गेल्या १५ वर्षांपासूनच्या महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी सरकारला मृत्युंदड द्या, असे आवाहन केले. तसेच ओबीसी व दलित समाजघटकांना उद्देशून सांगितले की, महाराष्ट्राच्या राजकारणात धनगर, माळी, मागासवर्गीय व दलित समाजाला न्याय मिळाला नाही. या समाजाला कुणीही विचारणारा नाही. त्यामुळे हा समाज मागे राहिला असून त्यांचा विकास झाला नाही, असेही मोदी यांनी नमूद केले. आपण गरिबीमध्ये जन्मलो असून गरिबीचे चटकेही सोसले आहेत. गरिबांसाठी जगण्याची आपली इच्छा असून त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवणार, अशी भावनिक सादही मोदी यांनी घातली.

भाऊबंदकीतून महाराष्ट्राला वाचवा
महाराष्ट्रात चार-पाच परिवारांनाच सत्ता मिळाली आहे. परिवारवाद, भाऊ-पुतण्यांच्या वादाने महाराष्ट्राचे नुकसान केले असून त्यातून महाराष्ट्राला मुक्त करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सत्तेमध्ये एकेकाळी जे सोबत होते, ते आज एकमेकांना शिव्या घालत आहेत, अशी टीकाही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नाव न घेता केली. त्यांच्यापासून आम्हाला महाराष्ट्राला वाचवायचे असून हिंगोलीतील ही विराट सभा त्याच परिवर्तनाची दिशा दाखवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.