आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळढोकला गतवैभव मिळण्याचा मार्ग मोकळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - शिकार व माळरानांवरील मानवी हस्तक्षेपामुळे माळढोकची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याला गतवैभव देण्यासाठी पक्षितज्ज्ञांनी कृत्रिम प्रजनन व संवर्धनाचा पर्याय सुचवला असून केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने त्याला मान्यता दिली आहे. महाराष्ट्राच्या प्रधान वन सचिवांनी या प्रकल्पासाठी दोन महिन्यांत जागा उपलब्ध करून देण्याची हमी देऊन जैवविविधतेप्रती आपला जिव्हाळा अधिक घट्ट केला आहे. राजस्थान, गुजरात व आंध्र प्रदेशातही अशी केंद्रे उभारली जाणार आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात या देखण्या पक्ष्याचा वावर अनेक राज्यांत होता. तथापि, त्याच्या मोठय़ा प्रमाणात शिकारी झाल्या. माळढोकचे मांस हे अनेक राजे व संस्थानिकांचे आवडते खाद्य होते तर या पक्ष्यांच्या शिकारी हा त्यांचा छंद होता. वाढते शहरीकरण, कारखानदारी, माळरानाचा शेती व चराईसाठी वापर यामुळे या पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास संकटात आला आहे. माळढोकची मादी वर्षातून केवळ एक अंडे देते. माळरानावरील गवताच्या अडोशात उघड्यावरच तिचे घरटे असते. भटकी कुत्री, मुंगूस, कोल्हे, चराईसाठी येणारी गुरे आदींमुळे अंडी उबवणुकीस धोका निर्माण झाला असून वंशवृद्धी प्रक्रियेला खीळ बसली. चार दशकांपूर्वी देशात दोन हजारांवर असलेले हे पक्षी आजघडीला केवळ दोनशेच उरले आहेत. प्रजात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला आहे. याकामी बीएनएचएसचे संचालक डॉ. असद रहेमानी यांच्यासह अन्य तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठित करण्यात आली आहे.
दिल्लीतील बैठकीत निर्णय :दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस राष्ट्रीय वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ. एम. के. रणजितसिंह, बीएनएचचे संचालक डॉ. असद रहेमानी, आंतरराष्ट्रीय पक्षितज्ज्ञ डॉ. नायजेल कॉलर (इंग्लंड), डॉ. किम (उझबेकिस्तान), भारत वन्यजीव संस्थानचे डॉ. यादवेंद्र, महाराष्ट्राचे प्रधान वन सचिव डॉ. प्रवीणसिंह परदेशी, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरातचे प्रधान वन सचिव, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी, विश्व प्रकृती निधीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
165 प्रजातींचे संरक्षण
या प्रकल्पामुळे माळढोकबरोबर माळरान व त्यावर आढळणार्‍या 165 पक्ष्यांच्या प्रजातींचे, वनस्पतीचेही संरक्षण होईल. सुजित नरवडे, माळढोक अभ्यासक
अशी असेल ब्रिडिंग
माळरानावर संवर्धन व प्रजनन केंद्र उभारले जाईल. नैसर्गिक अधिवासातून माळढोकांची अंडी मिळवून त्याची अंडी उबवणूक यंत्राच्या माध्यमातून पिले काढली जातील. पूर्ण वाढ होईपर्यंत केंद्रातच त्यांचा सांभाळ होईल. दाणी कशी टिपावीत, भक्ष्य कसे शोधावे, संरक्षणासाठी कोणत्या युक्त्या वापराव्यात याचे माळढोकच्या आकार व आवाजातील रोबोट प्रशिक्षण देईल. त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ वस्तीस्थानात सोडले जाईल. एक केंद्र उभारणीसाठी पहिल्या वर्षी सुमारे 15 कोटी व नंतर प्रतिवर्षी 5 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्याचा आराखडा सादर करण्याची सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्याच्या वन सचिवांना केली आहे.