आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Online Recruitment Process, Nanded District New Pattern

आता ऑनलाइन भरती प्रक्रिया, नांदेड जिल्ह्याचा नवा पॅटर्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - कॉपीमुक्ती, शालेय पटपडताळणीनंतर आता जिल्ह्याने ऑनलाइन रिक्रुटमेंटचा (नोकरभरती) नवा पॅटर्न निर्माण केला आहे. या पॅटर्ननुसार जिल्ह्यात जानेवारी महिन्यात 57 जणांची नेमणूक करण्यात आली असून हा पॅटर्न आता राज्य सरकारने स्वीकारला आहे.


वाढत्या लोकसंख्येमुळे शासकीय नोकरी मिळणे कठीण झाले आहे. एका जागेसाठी हजारो उमेदवारांचे अर्ज येतात. त्यासाठी मग प्रवेश अर्ज, ते स्वीकारण्यासाठी करावी लागणारी व्यवस्था, प्रवेशपत्र, उमेदवारांच्या आरक्षणनिहाय याद्या, पात्र, अपात्र उमेदवारांच्या याद्या, अर्ज सांभाळून ठेवण्यासाठी करावी लागणारी कसरत असे सर्व सोपस्कार पार पाडावे लागतात. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने ई-रिक्रुटमेंट हा पर्याय स्वीकारला आहे. या प्रणालीत उमेदवाराला अर्ज भरण्यापासून ते परीक्षेपर्यंत सर्व सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवाराला घरबसल्या अर्ज दाखल करता येतील. परीक्षा शुल्क बँकेत भरायचे असून त्यासाठी लागणारा चालानचा अर्जही ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहे.


अशी आहे प्रक्रिया
उमेदवाराने ऑनलाइन फॉर्म व्यवस्थित भरून सेव्ह केल्यानंतर स्क्रीनवर फॉर्म आयडी व तीन प्रतीत बँक चालान दिसेल. अर्जदाराने या चालानची प्रिंट काढून ती 24 तासांनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत रकमेसह जमा करावी. अर्जदाराने अर्ज भरल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय ते स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये देवाणघेवाणीला 24 तास लागतात. संकेतस्थळावर दिलेले चालान बँकेत वापरावे लागणार आहे. कारण या चालानवरील फॉर्म आयडी बँकेच्या कॅशियरने संगणकावर टाकताच त्या उमेदवाराची माहिती संगणकावर दिसेल. बँकेत पैसे भरल्यानंतर 24 तासांत उमेदवाराला प्रक्रिया पूर्ण झाल्याचा ई-मेल किंवा एसएमएस येईल. हा मेल किंवा मेसेज आल्यानंतर उमेदवार फॉर्मची पोचपावती काढून घेऊ शकतो. बँकेमध्ये चालानद्वारे रक्कम भरणा-या सर्व उमेदवारांना पात्र ठरवण्यात येईल. अर्ज स्वीकृती व चालान भरण्याची मुदत संपल्यानंतर काही दिवसांनी अर्जदारांना ऑनलाइन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. अर्जदारांना स्वत:चा फॉर्म आयडी व जन्मदिनांक टाकून प्रवेशपत्राची प्रिंट काढता येईल.


तीन स्तरात सुरक्षा
ऑनलाइन प्रक्रियेत डाटा लॉस, व्हायरस आदी अडचणी आहेत. त्याच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने तीन स्तरावर डाटा सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली. अर्जदाराचा फॉर्म सेव्ह झाला, त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्व्हरमध्ये सेव्ह होते. त्या माहितीच्या प्रतिचा एक ई-मेल सर्व्हरवरील ई-मेल आयडीवर जातो. दर बारा तासाला बॅकअप घेतले जाते. याशिवाय निवासी उपजिल्हाधिका-यांच्या संगणकावर सर्व माहिती टाकली जाते. ही प्रणाली दर तासाला अर्जदारांची माहिती जमा करते.


उत्तरपत्रिकांची संगणकीय तपासणी
उत्तरपत्रिका निर्दोषपणे व जलदगतीने तपासण्याकरिता ओएमआर (ऑप्टिकल मार्क रेकग्निशन) पद्धतीने तपासल्या जातात. उत्तरपत्रिका स्कॅन करून संगणकात टाकल्यानंतर अन्सर की टाकले जातात. आसन क्रमांकनिहाय निकाल तयार होतो. संगणकाद्वारे तयार झालेल्या काही उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या जातात. त्या उत्तरपत्रिकांची गुण पडताळणी करून संगणकाने दिलेल्या गुणांची खात्री केली जाते.


आयुक्तांचे आदेश
नांदेड जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ई-रिक्रुटमेंट प्रणालीचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.निशिकांत देशपांडे यांनी एक महिन्यापूर्वी औरंगाबाद येथे सादरीकरण केले. त्यानंतर विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ही प्रणाली मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अमलात आणावी, असे आदेश सर्व जिल्हाधिका-यांना दिले आहेत.


ऑनलाइनचे फायदे
> मनुष्यबळाची आवश्यकता नाही
> अर्जांच्या छाननीची आवश्यकता नाही
> डाटा एंट्रीची आवश्यकता नाही
> पात्र-अपात्रतेच्या याद्या तत्काळ उपलब्ध
> अर्ज, प्रवेशपत्र पोस्टाने पाठवण्याची गरज नाही
> डीडी, पोस्टल ऑर्डर बँकेत जमा करण्याची आवश्यकता नाही
> परीक्षा शुल्क थेट जिल्हाधिका-यांच्या खात्यात जमा
> अर्जांचे गठ्ठे सांभाळण्याची गरज नाही


सप्टेंबरमध्ये नव्या पॅटर्ननुसार राज्यात तलाठी भरती
जिल्ह्यात जानेवारीमध्ये 18 तलाठी व 29 लिपिकांची भरती करण्यात आली. त्यासाठी ही ई-रिक्रुटमेंटची प्रणाली प्रथम अवलंबण्यात आली. या जागांसाठी 16 हजार अर्ज आले. परंतु कोणताही गोंधळ, गैरप्रकार न होता भरती प्रक्रिया पार पडली. आता संपूर्ण राज्यात 1 सप्टेंबर रोजी तलाठी भरती व 29 सप्टेंबर रोजी लिपिक व शिपाई भरती होणार आहे. राज्य शासनाने या भरतीसाठी नांदेड पॅटर्न वापरण्याचे निश्चित केले आहे. ही भरती ई-रिक्रुटमेंटनेच होणार आहे.
डॉ.निशिकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड