आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रेशनच्या दुकानात मिळणार भाजीपालाही, बासमती, तेल, रवाही मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - खुल्या बाजारात विकला जाणारा लोकवन गहू, साखर, बासमती तांदूळ, खाद्यतेल, रवा, मैदा आदींसह भाजीपालाही आता रेशनच्या दुकानातून विक्री करण्याची परवानगी शासनाने परवानाधारक दुकानचालकांना दिली आहे. सुमारे १३ जुन्या शासन निर्णयांची अंमलबजावणी करत हा निर्णय घेण्यात आल्याने स्वस्त धान्य दुकानदार खासगी दुकानदारांना तगडी स्पर्धा निर्माण करणार आहेत.

राज्य शासनाने १७ एप्रिल २००३ रोजी आणि १५ जून २००४ रोजी स्वतंत्र शासनादेश संमत केले होते. या शासन निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून स्वस्त धान्यासह खुल्या बाजारात मिळणारे दर्जेदार धान्य व इतर खाद्य वस्तू बाजारभावाप्रमाणे विकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे दोन्ही शासनादेश राज्य सरकारने अधिक्रमित केले असून त्याचा फायदा स्वस्त धान्य परवानाधारकांना होणार आहे. आता रेशन परवानाधारकांना त्यांच्या दुकानातून मध्य प्रदेश सिहोर, गुजरात सिहोर, खांडवा आणि लोकवन या जातीचे गहू विकता येणार आहेत. याशिवाय होल, तुकडा, मोगरा या बासमती तांदळासह महाराष्ट्र व सुरती कोलम आदी ११ जातींचे तांदूळ विकता येणार आहेत.

सर्व खाद्यतेल, पामतेल, डाळी, गूळ, शेंगदाणे, रवा, मैदा, चणा पीठ आणि भाजीपालाही विकता येणार आहे. त्यामुळे शासनाची वितरण व्यवस्था चालवणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांना खासगी दुकानचालकांशी स्पर्धा करणे शक्य होणार आहे. याबाबत राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने २१ ऑक्टोबर रोजी नवीन शासनादेश जारी केला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

रेशन दुकानदारांना खुल्या बाजारातील माल रेशनच्या दुकानातून विकण्याची परवानगी अस्थायी स्वरूपाची असली तरी ही परवानगी किती दिवसांसाठी आहे, याचा शासनादेशात स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला व स्वस्त धान्य वितरणाबाबत कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत तर हा प्रयोग कायमस्वरूपी लागू होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...