अंबाजोगाई - महाविद्यालयीन युवतीशी मैत्री करत तिची आक्षेपार्ह चित्रफीत तयार करून ती सोशल मीडियावर पसरवत तिचे लग्न मोडणाऱ्या विश्वंभर शेषराव तिडके या तरुणावर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेला प्रकार जर कोणाला सांगितला तर तुझ्या भावाचा बंदुकीने खून करेल, अशी धमकीदेखील तरुणाने युवतीला दिली होती.
अंबाजोगाई शहरातील एका युवतीशी २०१४ मध्ये विश्वंभर तिडके या तरुणांची मैत्री झाली होती. मैत्रीचा गैरफायदा घेत विश्वंभरने युवतीचा फोटो मागवून घेऊन संगणकावर स्वत:चा फोटो जोडला होता. तुझा आणि माझा फोटो आता मी माझ्या मित्रांनाच दाखवतो अशी युवतीला धमकी देऊन त्याने ब्लॅकमेल करत युवतीचा विनयभंग केला. याची एक चित्रफीत तयार केली होती. हा प्रकार कोणाला सांगितला तर माझ्याजवळील बंदुकीने तुझ्या भावाचा खून करीन अशी धमकीही युवतीला दिली होती. घाबरलेल्या युवतीने या घटनेची वाच्यता कुठेही केली नाही. याचाच गैरफायदा घेऊन विश्वंभर तिडके याने आक्षेपार्ह चित्रफीत सोशल मीडियावरून मित्रांना पाठवत व्हायरल केली. दरम्यान, घडलेला हा प्रकार समजताच पोलिस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली.