आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Officers Who Make Deferment In Water Supply Will Be Actioned

पाणीपुरवठा योजना कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई, मंत्री लोणीकर यांच्या सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, पाणीपुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजनांची अपूर्ण व नवीन कामे प्रशासकीय बाबींची पूर्तता करून तातडीने सुरू करण्यात यावीत. या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्या. दरम्यान, कामे वेळेवर न झाल्यामुळे सध्या मराठवाड्यात जवळपास १ हजार ४०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, पाणीपुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व स्वच्छ भारत मिशनच्या मराठवाडास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी उपसचिव किरणकुमार कोसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता एस.जी. मुखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांची प्रमुख उपस्थिती होती. लोणीकर म्हणाले, पाणीपुरवठ्याच्या योजनांची कामे करण्यासाठी ग्रामस्तरावर पाणीपुरवठा समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीमार्फत कामे केली जात नसतील तर गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावात जाऊन बैठका घेऊन समित्यांना याबाबत मार्गदर्शन करावे. या समित्या काम करत नसतील तर त्यांच्यावर प्रशासनामार्फत योग्य ती कारवाई करण्यात यावी.
पाणीपुरवठ्याच्या योजना राबवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कामे वेळेवर न झाल्यामुळे सध्या मराठवाड्यात जवळपास १ हजार ४०० टँकरद्वारे जनतेला पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्याची कामे वेळेवर झाली तर जनतेला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही. शासनामार्फत देण्यात आलेल्या निधीतून दिलेल्या कामाची गुणवत्ता उत्तम दर्जाची राखत वेळेत खर्च करण्यात यावा. निधी वेळेत खर्च न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी या वेळी केल्या. सर्वसामान्यांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत यशस्वीरीत्या पोहोचून त्याचा त्यांना लाभ मिळावा यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन देते.
मराठवाड्यात १ हजार ८०६ कामे मंजूर
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत मराठवाड्यात एकूण १ हजार ८०६ कामे मंजूर असून त्यापैकी ७५१ कामे प्रगतिपथावर आहेत. तर १ हजार ५५ कामे तांत्रिक अडचणीमुळे सुरू झालेली नाहीत. यामध्ये औरंगाबाद २४५ पैकी १७६ कामे प्रगतिपथावर आहेत. जालना १८१ पैकी ३६, परभणी १५४ पैकी १०१ , हिंगोली ८४ पैकी ३७, नांदेड ४८७ पैकी १३९, उस्मानाबाद १६३ पैकी ३३, बीड ३२५ पैकी १५२, तर लातूर जिल्ह्यातील १६७ पैकी ७७ कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती या वेळी पॉवर पॉइंटच्या माध्यमातून देण्यात आली. या बैठकीस औरंगाबादचे कार्यकारी अभियंता रबडे, परभणीचे निवडुंगे, उस्मानाबादचे चाटे, लातूरचे शेलार, जालन्याचे तांगडे, हिंगोली, नांदेड येथील कार्यकारी अभियंता, जालना येथील स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बशीर पटेल यांच्यासह मराठवाड्यातील स्वच्छता विभागाचे सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
परभणीत महिलांचा घागर मोर्चा
शहरातील प्रभाग क्रमांक २६ मधील शंकरनगरवासीयांनी पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी महापालिकेवर घागर मोर्चा काढला. शिवसेनेचे मारुती तिथे यांच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांनी घागरी घेऊन सहभाग नोंदवला.
शंकरनगरात पाण्याचा ठणठणाट असून नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आहेत. या प्रभागाच्या नगरसेविका संगीता वडकर या महापौर असतानादेखील या भागात २२ दिवस पाणी येत नाही. नळाच्या पाइपलाइनला जागोजागी अडवून पाणी ठरावीक लोकांपुरतेच मर्यादित केले आहे. अनेक भागांत जलवाहिनी असूनदेखील पाणी येत नाही. तरीदेखील मनपा पाणीपट्टी जबरीने वसूल करत आहे.
प्रभागात कुठल्याच प्रकारची स्वच्छता नाही. नगरसेवकाच्या घरापुरतेच भाग स्वच्छ केले जातात, असा आरोपही नागरिकांनी केला. आयुक्त अभय महाजन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात मारुती तिथे, विजय भालेराव, संदीप डुकरे, संतोष गायकवाड, ज्ञानेश्वर पवार आदींचा सहभाग होता.