आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On The Fourth Days Of Marriage Lady Tourched, Four Men Arrested

बीडमध्‍ये लग्नाच्या चौथ्या दिवशी विवाहितेला जाळले,चौघांवर गुन्हा दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - मुलगी झाली म्हणून माजलगावमध्ये गुरुवारीच सासरच्या मंडळींनी विवाहितेला पेटवले. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करत पेटवून दिल्याचा प्रकार बीड शहरात घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत माहिती मिळताच बीडमध्ये धडकलेल्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींवर आरोप करत त्यांना ठोकून काढले.
दोन फेब्रुवारी रोजी शेख नसरिनचा (आझादनगर, माजलगाव) शेख चाँद यांचा मुलगा शेख अमिर (बांगरनाला, बीड) याच्याबरोबर विवाह झाला. विवाह होऊन चार दिवस उलटत नाहीत तोच सासरच्या मंडळीकडून नसरिनचा छळ सुरू झाला. नसरिनला सासरच्या मंडळीनी कोंबड्याच्या खुराड्यात ठेवले. शरीरिक व मानसिक छळ करून तिला उपाशी ठेवले. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास नसरीन झोपेत असताना पती शेख अमिरसह सासू, जाऊ, नंदा अशा चौघांनी रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. यात ती 90 टक्के भाजली. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल झाला.
बीड जिल्हा रुग्णालयात दोन गटांत हाणामारी
शेख नसरिनला सासरच्या मंडळींनी पेटवून दिल्याची माहिती माहेरच्या मंडळींना मिळताच ते माजलगावातून बीडमध्ये धावले. ते दुपारी जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यापाठोपाठ सासरची मंडळीही वॉर्ड क्रमांक सहामध्ये जमली. सासरचे व माहेरचे सर्वजण समोरासमोर आल्याने वादाला तोंड फुटले व काही क्षणांत हाणामारीला सुरुवात झाली. तासभर हा गोंधळ सुरू होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वांना शांत केले.