आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळबागा सुकल्या; गावाचे 100 कोटी दुष्काळात स्वाहा, अंबेजवळगेची व्यथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- तीन वर्षांच्या सलग दुष्काळाने बागायतदार गाव म्हणून लौकिक असलेल्या अंबेजवळगेची निव्वळ दैना केली आहे. सुगीच्या काळात १०० ते १२५ कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या गावात सध्या नगण्य उलाढाल आहे.

रसाळ व मधुर मोसंबी आणि दर्जेदार द्राक्षांचे गाव म्हणून अंबेजवळगेने गेल्या दहा वर्षात राज्यासह, आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या विविध बाजारपेठांत नाव कमावले आहे. सुमारे ७५० एकरांवरील फळबागा वाळून जात आहेत, पीक हाती न आल्याने यंदाच्या दुष्काळाने
गावच्या वाट्याचे १०० कोटी रुपये गिळंकृत केले आहेत.

गावातील अव्वल बागायतदारांपेकी एक संपत सातपुते यांना यंदा २५ लाखांचा फटका बसला आहे. हनुमंत कुळेकर यांना चार ते पाच लाखांचा, काका यादव यांना दोन ते तीन लाखांचा तर विठ्ठल सातपुते यांना किमान साडेचार लाखांचा फटका बसला आहे. अंबजवळगेत प्रत्येक उंबरा दुष्काळाच्या आर्थिक फटका सहन करतो आहे. या संदर्भात संपत सातपुते यांनीउर्वरित. पान १०

सांगितले, वर्षापूर्वी ५० ते ६० टन केळी निर्यात केली होती. आता लागलेल्या केळी घडांसह बाग सोडून देण्याची वेळ आली आहे. पाणीच नाही. काय करणार ? एकतरी चांगले पाणी मिळाले असते तर केळी जगली असते आणि ८ ते ९ लाख रुपये देऊन गेली असती. तोंडचा घास दुष्काळाने हिरावला. पाच एकरवर ऊस होता, २.५ एकर द्राक्ष बाग आता उन्हाच्या चटक्याने करपू लागली आहे.

माझ्याकडे चार एकर मोसंबी आहे. केळीपेक्षा मोसंबी जगवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम दर्जा असल्याने अंबेजवळगेच्या मोसंबीला बाजारपेठेत खूप मागणी आहे. मोसंबीची बाग गेली तर आम्ही पाच ते सात वर्षे मागे जातो. हे नुकसान टाळण्यासाठी मोसंबी वाचवणे आमच्या दृष्टीने म्हत्त्वाचे आहे. एरव्ही निव्वळ दहा ते १५ हजार रुपयांच्या खर्चात मोसंबी एकरी दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळवून देते. यंदा निव्वळ पाण्यासाठी सात ते आठ लाख रुपये खर्च केला आहे. तरीही दुष्काळाने बागा करपत आहेत.

पाणी दुप्पट खोल :
हनुमंत कुळेकर म्हणाले, मला यंदाच्या दुष्काळाने चार ते पाच लाखांचा फटका दिला आहे. पाण्याअभावी मोसंबीच्या बागा वाळून जात आहेत. गावात अनेकांनी यंदा बोअर मारले; पण पाणी लागले नाही. गावात सरासरी ३०० ते ३५० फुटांवर चांगले पाणी लागते. यंदा ७०० ते ७५० फूट खोल गेले तरी नुसताच फुपाटा येत आहे. पाण्याचा टिपूस नाही. आता केवळ दुष्काळाचा खेळ बघणे एवढेच काय ते हाती आहे.

या पिकांवरच गावचे अर्थकारण चालते. सांगलीत या मोसंबीला मानाचे स्थान. चांगला भावही मिळतो. हैदराबाद, लातूर, बार्शी, उस्मानाबाद, सोलापूर, बंगळुरूचे व्यापारी येतात. सुगीत गावची उलाढाल १०० ते १२५ कोटी रुपयांवर जाते. यंदा दुष्काळाने फटका.