आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड - दिल्लीत बलात्कार विरोधात कडक कायदा तयार होत असताना नांदेड जिल्ह्यात एकापाठोपाठ एक बलात्काराच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे जिल्हा हादरून गेला असून लोहा तालुक्यातील पांगरी येथे बलात्कार व नायगाव येथे आठवर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा उघडकीस आली. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत बलात्काराच्या सात घटना घडल्या आहेत. या प्रकारांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मंगळवारी उघडकीस आलेल्या भोकर येथील चौदा वर्षांच्या मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर लोहा तालुक्यातील पांगरी येथे घराजवळील शेतात शौचास गेलेल्या मूकबधिर मुलीवर गावातीलच एका युवकाने बलात्कार केल्याची घटना मंगळवारी दुपारी 3.30 ते 4 वाजेच्या सुमारास घडली.
पांगरी येथील अल्पवयीन मुलीचे आई-वडील मंगळवारी आठवडी बाजारासाठी लोहा येथे गेले होते. दुपारी मुलगी घरामागील शेतात शौचास गेली असता रामेश्वर पंडितराव बुद्रुक ( 30) याने तिच्यावर बलात्कार केला. मुलीचे आई-वडील संध्याकाळी घरी आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर लोहा पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध बलात्कार व अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे मंगळवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात दहा दिवसांत घडल्या सात घटना
नांदेड जिल्ह्यात एकापाठोपाठ एक बलात्काराच्या घटना घडत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे 26 जानेवारी रोजी नांदेड येथील लक्ष्मीनगर भागातील एका महिलेस घरातून मैदानात ओढून नेऊन मद्यधुंद चार तरुणांनी बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर 28 जानेवारी रोजी किनवट तालुक्यातील नंदगाव येथील आदिवासी महिलेच्या असहायतेचा फायदा घेऊन बलात्कार केल्याची घटना घडली. 30 जानेवारी रोजी उमरी तालुक्यातील मोखंंडी येथील ऊसतोड कामगाराची अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचे पाहून एका महिलेच्या मदतीने गावच्या उपसरपंचाने घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
बदनामीच्या भीतीने मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली. देगलूर तालुक्यातील क्यादरकुंटा येथे अल्पवयीन मुलीवर एका शेतात बलात्कार केल्याचा गुन्हा देगलूर पोलिस ठाण्यात 31 जानेवारी रोजी दाखल करण्यात आला होता. रविवार, 3 फेबु्रवारी रोजी काकांडी येथे 20 वर्षीय मुलीचा खून करून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचा छडा लागेपर्यंत भोकर येथे 14 वर्षांच्या मुलीवर चौघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर लोहा व नायगावची घटना मंगळवारी रात्री उशिरा उघडकीस आली.
आरोपींना कोठडी
भोकर येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करणा-या तीन आरोपींना भोकर न्यायालयाचे न्यायाधीश श्रीनाथ फड यांनी 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, तर चंद्रमा रिसोर्टचा मालक असलेल्या आरोपीची प्रकृती बिघडल्याने त्यास नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
बलात्काराच्या प्रत्येक घटनेचा तपास करून आरोपींना कडक शिक्षा होईल यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा तपास वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडे देण्यात आला आहे.’ विठ्ठलराव जाधव, पोलिस अधीक्षक नांदेड.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.