आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओव्हरटेकच्या प्रयत्नात बस दरीत कोसळली, नाचनवेलच्या वृद्धेचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - निराधार योजनेचे अनुदान घेण्यासाठी नाचनवेलहून कन्नडकडे बसमध्ये निघालेल्या निराधार वृद्धेचा बस अपघतात मृत्यू झाला. सिल्लोडहून कन्नडकडे जाणारी बस कोळसवाडीजवळ असलेल्या चिंचबारी खांडीत दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चार पलट्या खऊन तीस फूट दरीत कोसळली. या अपघातात १४ प्रवासी गंभीर व १० जण किरकोळ जखमी झाले.

कन्नड आगाराची बस (एमएच २० डी ९९२४) ही सिल्लोडहून कन्नडकडे येत होती. कन्नड-पिशोर रस्त्यादरम्यान असलेल्या कोळसवाडीजवळील चिंचबारी येथील रस्त्याच्या कडेवरून साधारण ३० फूट खाली कोसळून बस उलटली. ही घटना समोरच्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने घडली. बस रस्त्याच्या कडेवरून खाली कोसळताना ती झाडांमध्ये अडकत अडकत पडली. यादरम्यान तिने तीन ते चार पलट्या खाल्ल्या. यात चालक व वाहक आणि ४२ प्रवासी असे एकूण ४४ जण होते. या अपघातात ठगाबाई भावलाल भगुरे (६५, नाचनवेल) यांचा जागीच मृत्यू झाला. १४ जण गंभीर तर १० जण किरकोळ जखमी झाले. त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात (घाटी) उपचारार्थ हलवण्यात आले, तर किरकोळ जखमी झालेल्या दहा जणांवर कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. बसचालक इब्राहिम शहा मुन्शी (४०, नाचनवेल), वाहक रत्नाकर विठ्ठल ताठे (५०, देवपुळ-वासडी), तुळसाबाई श्यामलाल लोहार (४५, कन्नड), कमल गोकुळ परदेशी (६०, भराडी, ता. सिल्लोड), रेखा प्रताप परदेशी (६०, चाळीसगाव), भास्करराव शेळके (६०, टाकळी), तर पिशोर येथील जनार्दन मोकासे (६०), सुलोचना चौतमल (६०), नारायण ओपळकर ( ५५), महंमद शहा गनी शहा (३३), किशोर दगडू भिसे (६२, बोरगाव बाजार), गोविंद सदावर्ते (७१, सिल्लोड), तुळशीराम अंभोरे (४५, सिल्लोड), अस्मा कासीम खान (२२, मालेगाव) आदींसह १४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देवगावकर, डॉ. प्रवीण पवार, डॉ. विशाल बेद्रे, डॉ. प्रशांत कोंडेकर आदींनी उपचार करून जखमींना घाटीत पुढील उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.

अपघाताचे वृत्त समजताच कन्नड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस उपनिरीक्षक एजाज सिद्दिकी, पोलिस हेड कॉन्स्टेबल कैलास िनंभोरकर, सलीम शहा, ज्ञानेश्वर बरडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

कन्नड आगारातून मृतास व जखमींना मदत
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ठगाबाई भगुरे यांच्या नातेवाइकास कन्नड आगारातून दहा हजारांची, तर जखमींना प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत देण्यात आली, अशी माहिती कन्नडचे आगारप्रमुख लक्ष्मण लोखंडे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...