आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊबीज भेट: आधार कार्डच्या आधारे शोध घेत शेतकर्‍याने परत केले दागिने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड- सुखापुरी येथील डॉ. ढवळे हे कुटुंब दीपावलीच्या दिवशी बुधवारी सुखापुरी येथून जालन्याकडे येत असताना त्यांची पर्स पडली. हे कुटुंब पेट्रोलपंपावर थांबले असता, पर्स पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेमुळे जालना येथे न जाता गावाकडे परतले. दरम्यान, पर्समध्ये सोन्या, चांदीचे दागिने, मोबाइल असा एकंदरीत एक लाखापर्यंत ऐवज होता.

ऐन सणासुदीत हा प्रकार झाल्याने ढवळे कुटुंबीय निराश झाले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळीच दोन शेतकऱ्यांनी पर्स घरी आणून दिल्यामुळे या महिलेस भाऊबिजेला भावाने एकप्रकारे भेटच दिली असल्याच्या प्रतिक्रिया या महिलेने व्यक्त केली.

रामनगर येथील शेतकरी सुभाष राठोड व लहू जाधव हे सकाळी अंबडकडे जात असताना मत्स्योदरी देवी पुलाजवळ त्यांना रोडवर पर्स पडलेली दिसली. या पर्समध्ये सोन्या, चांदीचे दागिनेे, मोबाइल असे मिळून एक लाखापर्यंत या ऐवज होता. मात्र, या शेतकऱ्यांना पर्समध्ये आधार कार्ड असल्याचे दिसले.

सुखापुरी येथील डॉ.गणेश ढवळे व रोहिणी ढवळे यांचा हा ऐवज असल्याचे निदर्शनास आले. पर्स हरविल्याबाबत ढवळे कुटुंबीय हे तक्रार देण्यासाठी अंबडकडे निघालेले असताना शेतकरी सुभाष राठोड आणि लहू जाधव हे घरी आले. त्यांनी हा प्रकार सांगून पर्स परत दिली. हरवलेली पर्स परत मिळवून दिल्यामुळे आनंदित झालेल्या ढवळे कुटुंबीयांनी दोघांनाही पाच हजार रुपये बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी संतोष रागुंडे, शरद ढवळे, दत्तू फाटक यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

सकारात्मक बदल
आजच्या काळात माणुसकी हरवत चालली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने कुठल्याही घटना घडत असताना नकारात्मक न वागता सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने कामे करावी.''
-सुभाष राठोड, शेतकरी.

माणुसकी जिवंत
आजच्या काळात अनेकांच्या तोंडून माणुसकी नसल्याचे ऐकल्या जाते. सुभाष राठोड आणि लहू जाधव यांनी हरवलेली पर्स परत करून एकप्रकारे भावाची भूमिका बजावली आहे.
- रोहिणी ढवळे, महिला सुखापुरी.