आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूरमध्‍ये सिध्‍देश्‍वर यात्रेत सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर-रत्नेश्वर देवस्थान समितीच्या वतीने आयोजित यात्रेच्या शेवटच्या दिवशी रविवारी रात्री खासगी सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात यात्रेत लावणी पाहायला आलेल्या सोमनाथ कांबळे या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी खासगी सुरक्षा रक्षक अशोक बिरादार याला अटक केली असून त्याला 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, यात्रेचे हे 59 वे वर्षे होते. या घटनेमुळे उत्सवाला गालबोट लागले आहे.

रविवारी रात्री यात्रेचा शेवटचा दिवस होता. यात्रेमध्ये आयोजित लावण्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती. त्याच्या शेजारीच असलेल्या आनंदमेळ्यातही गर्दी उसळली होती. तेथेच दिवसभर जमा झालेली रक्कम ठेवण्यात येते. त्याच्या सुरक्षेसाठी यात्रा समितीने मुंबईच्या छत्रपती सिक्युरिटीज या कंपनीला काम दिले होते. त्या कंपनीने अशोक बिरादार या माजी सैनिकाला तेथे नेमले होते. रविवारी रात्री 11 वाजता तो सुरक्षेसाठी तैनात असतानाच पैसे ठेवलेल्या मंडपाच्या बाजूला एक तरुण येत असल्याचे बिरादार यांना दिसले. त्यांनी त्याला हटकल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यातच बिरादार यांनी रागाच्या भरात त्यांच्याजवळ असलेल्या 12 बोअरच्या बंदुकीतून तरुणावर गोळी झाडली. त्यामध्ये तो जागीच ठार झाला. गोळीबार झाल्यानंतर एकच धावपळ उडाली होती.

दरम्यान, पोलिसांनी लगेचच अशोक बिरादार या खासगी सुरक्षा रक्षकाला अटक केली. त्याच्याकडून बंदूकही जप्त करण्यात आली. सोमवारी दुपारी त्याला कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्याला 30 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी सकाळी पोलिसांनी सोमनाथचा पोस्टमॉर्टेम केलेला मृतदेह नातेवाइकांकडे सोपवला. त्याच्यावर गणेशवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक केशव लटपटे यांनी सांगितले.

मोबाइलमुळे पटली ओळख
घटनेनंतर मृत तरुणासोबतचे सहकारी फरार झाले. त्याच्याकडे असलेला मोबाइल हाच त्याची ओळख पटवण्यासाठी उपयुक्त ठरणार होता. मात्र, त्याची बॅटरी लो असल्यामुळे तो बंद पडला. बॅटरी चार्ज केल्यानंतर पासवर्डमुळे तो उघडत नव्हता. रात्री उशिरा पोलिसांनी संगणकतज्ज्ञांच्या मदतीने मोबाइल सुरू करण्यात यश मिळवले. त्याआधारे तपास केल्यानंतर मृत तरुण शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गणेशवाडी येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. सोमनाथ कांबळे (25) असे मृत तरुणाचे नाव असून तो मित्रांसोबत यात्रेत लावणी पाहण्यासाठी आला होता. तो मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो. त्याच्या मित्रांनी आग्रह केल्यामुळे तो यात्रेत आला होता.