आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका एसएमएसने वाचवली 15 कोटींची द्राक्षे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - आंध्र प्रदेशातील फायलिन चक्रीवादळाने द्राक्षबागांना बसणार्‍या संभाव्य फटक्याला एका एसएमएसने परतवले असून यामुळे जिल्ह्यातील 800 एकरांवरील द्राक्षबागा सुरक्षित राहिल्या आहेत. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने द्राक्षबागायतदारांना वादळ व त्यामुळे होणार्‍या वातावरण बदलाची पूर्वकल्पना दिल्याने संकट टळले आहे.
जिल्ह्यात 800 एकर द्राक्षबागा असून 370 द्राक्षबागायतदार ही शेती करतात. यातील 400 एकर द्राक्षाची निर्यात यूके, युरोप, मध्यपूर्व यूएई येथे होते. यातून दरवर्षी 20 ते 22 कोटींचे परकीय चलन मिळते. आठ वर्षांपूर्वी 1600 हेक्टर्सवर द्राक्षशेती होती. तथापि, अपेडाच्या बेफिकिरीमुळे 2010 मध्ये मोठे नुकसान झाले होते. केंद्र शासनानेही शेतकरी व निर्यातदारांना सहकार्य न केल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी 50 टक्के द्राक्षबागांवर नांगर फिरवला होता. अधिक खर्च व कमी उत्त्पन्न ही विसंगतीही त्याला कारणीभूत होती. वातावरण बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात येत असून राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. द्राक्षांवर पडणारे रोग, करावयाची उपाययोजना, खताच्या मात्रा, छाटणी, काढणी, काढणीपश्चात घ्यायची काळजी याबाबत हे केंद्र माहिती देते. ही माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते.
वातावरणातील बदलामुळे द्राक्षबागांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची अधिक शक्यता असते. याविषयी शेतकर्‍यांना वेळेआधीच सजग करणे गरजेचे असते. त्यामुळे मोबाइल एसएमएसद्वारे ही माहिती शेतकर्‍यांना मोफत कळवण्यात येते. साधारणपणे 2 ते 4 ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील द्राक्ष छाटणीला सुरुवात होते. त्यानंतर वातावरणात बदल झाला, तर डाऊनीचा प्रादुर्भाव या पिकावर होतो. द्राक्षांचे घड जिरतात व मोठे नुकसान होते. आंध्र प्रदेशात होणार्‍या वादळाचा व त्यामुळे होणार्‍या वातावरण बदलाचा अंदाज द्राक्ष संशोधन केंद्राला आला होता. शनिवार ते सोमवार हे तीन दिवस पावसाची शक्यताही त्यांनी वर्तवली होती. त्यामुळे द्राक्ष छाटण्या 10 दिवस लांबवण्याचा सल्ला त्यांनी बागायतदारांना दिला होता.

...तर 50 टक्के फटका
छाटणीनंतर हे वादळ आले असते, तर त्यामुळे होणार्‍या वातावरण बदलामुळे रोग पडून 50 टक्के फटका बसला असता. सुमारे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले असते.

तुरीला बसणार फटका
सध्या तूर फुलोर्‍यात असून ढगाळ वातावरणामुळे हा फुलोरा गळणार आहे.

नुकसान टळले
छाटणीनंतर असे वातावरण झाले असते, तर द्राक्षबागांना डाऊनीचा विळखा पडला असता. नेहमीप्रमाणे आम्ही एक ते चार ऑक्टोबरपासून छाटणी सुरू करणार होतो. त्यासाठी मजूरही ठरवले होते; परंतु 8 दिवसांपूर्वी एनआरसीने या संभाव्य धोक्याची व छाटणी पुढे ढकलण्याची सूचना दिली. त्यामुळे नुकसान टळले.
तुकाराम येलाले, संचालक, लातूर जिल्हा द्राक्षबागायतदार संघ.