आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालन्‍यात एक हजार ट्रकची चाके थांबली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- नवीन एमआयडीसीतील स्टील कंपन्यांमध्ये औरंगाबाद केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून दोन दिवसांपासून सलग तपासणी सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत तपासणीचे काम चालेल, असे केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे स्टील कंपन्यासाठी भंगारची वाहतूक करणा-या सुमारे 1 हजार ट्रकची चाके थांबली आहेत.

बुधवारी सकाळी 6 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत सहा. आयुक्त एम. आर. जवरे यांच्या नेतृत्वाखाली 40 जणांच्या पथकाने स्टील कंपन्यांमध्ये तपासणीला सुरुवात केली. गुरुवारी आणखी 20 जणांना बोलावण्यात आले. शुक्रवारपर्यंत हे काम सुरू राहणार आहे.

भंगारचे ट्रक ठप्प
स्टील कंपन्यांमध्ये 32 ब्लेड व 12 रोलिंग मिल्सचा समावेश आहे. याठिकाणी सळई उत्पादनासाठी आवश्यक असणारा कच्चा माल राज्यासह परदेशातून येतो. दिवसाकाठी 500 ट्रक भंगार येते. दोन दिवसांपासून तपासणी सुरू असल्यामुळे भंगारचे जवळपास एक हजारांवर ट्रक बाहेरच थांबवण्यात आले आहेत. परिणामी दोन हजारांवर ट्रकचालक व क्लीनर हवालदिल झाले आहेत.

कारखाने अडचणीत
सळईच्या विक्री व भावात घसरण झाल्यामुळे स्टील कारखानदार अडचणीत आले आहेत. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेला हा व्यवसाय अडचणीत आला आहे. प्रत्यक्षात शासनाकडून उद्योगांना दिलासा देण्याऐवजी वेठीस धरले जात आहे. याबाबत शासनाकडून सकारात्मक विचार व्हावा व उद्योगांना मंदीतून बाहेर काढावे, अशी प्रतिक्रिया उद्योजकांनी दिली.


पारदर्शकतेसाठी तपासणी
एमआयडीसीत उत्पादित केलेल्या मालाचे नियमित व योग्य उत्पादन शुल्क शासनाकडे भरले जाते काय? नेमके किती उत्पादन होते व यातून किती शुल्क मिळणे अपेक्षित आहे यासाठी ही तपासणी केली जात आहे. शुक्रवारी सायंकाळी याबाबत माहिती मिळेल व त्यानंतरच योग्य ती कार्यवाही केली जाईल.
कुमार संतोष, आयुक्त, केंद्रीय उत्पादन, औरंगाबाद


ट्रकमालकांना 5 लाखांचा भुर्दंड
दोन दिवसांपासून तपासणी सुरू असल्यामुळे भंगारचे एक हजारावर ट्रक उभे आहेत. एका ट्रकवर एक चालक व एक क्लीनर गृहीत धरल्यास ही संख्या 2 हजारांवर पोहोचते. दोघांना अनुक्रमे मासिक 10 व 6 हजार रुपये महिना पगार मिळतो. अर्थात अनुक्रमे 333 व 200 रुपये प्रतिदिवस होतात. मात्र, दोन दिवसांपासून ट्रक जागेवरच उभे असल्यामुळे संबंधित ट्रकमालकांवर 2 हजार चालक व क्लीनरचा अधिकचा बोजा पडला आहे. दोघांची मिळून ही रक्कम पाच लाख 33 हजार 333 रुपये होते.

250 ट्रकची डिलिव्हरी ठप्प
उत्पादित मालाची तपासणी सुरू असल्यामुळे दिवसभरात 250 ट्रकद्वारे माल बाहेर नेण्याचे थांबले होते. मात्र, गुरुवारी ही प्रक्रिया पूर्ववत सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

उद्योजक हवालदिल
आर्थिक मंदीमुळे सळईच्या विक्रीस बे्रक लागला आहे. परिणामी कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. दरम्यान, मालाची घटती मागणी व वाढता तोटा लक्षात घेऊन सर्व कारखानदारांनी 11 आॅगस्टपासून उत्पादन 12 तासांवर आणले आहे.