आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Voice Against Dalit On Global Level, 10 Lakh Signatures Application Give UN

दलित अत्याचाराविरूद्ध जागतिक मंचावर एल्गार! संयुक्त राष्ट्राला देणार निवेदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - देशातील दलित अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी जगभरातील चळवळीतील कार्यकर्ते, नेते आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन एल्गार पुकारला आहे. या मुद्याकडे जागतिक समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी १८० देशांमध्ये विशेष स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत २ लाख नागरिकांच्या स्वाक्ष-याही घेण्यात आल्या असून येत्या २६ जानेवारीपर्यंत दहा लाख सह्यांचे निवेदन संयुक्त राष्ट्राला देण्यात येणार आहे.
एखाद्या समस्येसंदर्भात १० लाख सह्यांचे निवेदन आले तर तो विषय संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेसमोर (जनरल असेंबली) ठेवला जातो. हीच बाब लक्षात घेत देशातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येत १० लाख सह्यांच्या मोहिमेसाठी काम सुरु केले आहे. न्यूयॉर्क
येथे असलेले दिलीप म्हस्के यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी देशभरात राज्यस्तरावर स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या आहेत.हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व्हॉटस अ‍ॅप,फेसबुक या साेशल नटवर्क साईट्सची मदत घेतली जात आहे. राज्यात भालचंद्र मुणगेकर,नरेंद्र जाधव आदींनी या मोहिमेसाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी कृष्णवर्णीयांच्या
हक्कासाठी अमेरिकेत प्रो.डुबीस यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारची मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर दलितांच्या हक्कासाठी प्रथमच अशी मोहीम राबविली जात असल्याचे दिलीप म्हस्के यांनी सांगितले. शिवाय या स्वाक्षरी अभियानाच्या माध्यमातून देशातील दलित अत्याचाराच्या संदर्भात काम करणा-या कार्यकर्त्यांना आंतराष्ट्रीय पातळीवर प्लॅटफॉर्म उपल्ब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जात आहे असे त्यांनी सांगितले.

हॉलीवूड अभिनेत्री झाल्या सहभागी
मोहिमेत हॉलीवूडच्या अभिनेत्री व मॉडेल्स सहभागी आहेत. लव्ह मॅटर्स-कास्ट डझन्ट, गॉड मॅटर्स-कास्ट डझन्ट, या आशयाच्या पोस्ट सोशल साईटसवरुन शेअर केल्या जात आहे. यात मिस हॉलीवूड रोलीता फारीख, मिस अरब जेनीवा झेन्दीना, मिस अरब रनर अप रतीबा अझीझी, न्यूयॉर्क येथील प्रख्यात वकिल, लेखिका व मॉडेल पावोला ग्रासिला आदींचा समावेश आहे.

चर्चेनंतर चौकशी
२६ जानेवारीपर्यंत ही मोहिम पूर्ण झाल्यानंतर निवेदन सादर केले जाईल. यूनोच्या सर्वसाधारण सभेत दलित अत्याचाराच्या मुद्द्यावर चर्चा होईल. दलित अत्याचाराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ समिती नियुक्त करू शकते. पीडितांना आंतराष्ट्रीय पातळीवर न्याय देण्याचा प्रयत्न होईल, असे म्हस्के यांनी सांगितले.

समविचारींची साखळी
मानवी हक्क आणि दलित अत्याचाराविरूद्ध ही मोहिम आहे. या मोहिमेसाठी समतावादी विचाराचे,घटनेतील मूल्य मानणा-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आहे.
-सुभाष लोमटे, सामाजिक कार्यकर्ते, औरंगाबाद.

प्रयत्न यशस्वी होईल
देशात दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. त्यात आम्हाला नक्कीच यश मिळेल.
दिलीप म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते, न्यूयॉर्क