आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडीत केवळ ४ टक्के साठा, ऐन जूनमध्ये भासणार टंचाईच्या झळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - मे महिन्याच्या प्रारंभी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आठ टक्क्यांवर होता, परंतु आठ दिवसांत परळी व गेवराईला २२०० क्युसेकने पाणी सोडल्याने आजघडीला धरणाचा पाणीसाठा ४ टक्क्यांवर आला आहे. हे पाणी सुरूच राहणार असल्याने या आठ दिवसांत धरणाचा पाणीसाठा दोन टक्क्यांवर येईल यात शंका नाही.
सध्या जायकवाडीचा पाणीसाठा १४९६.५९ फूट, तर ४५६.१६१ मीटर आहे. एकूण पाणीसाठा ८४०.२७४ जिवंत पाणी १०२.१६८ टक्क्यांवरून ४.०० वर आला आहे. शिवाय परळीला एक हजार १०० क्युसेक, गेवराई- ६०० क्युसेक वेगाने पाणी सुरूच राहणार असून पावसाळा वेळेत सुरू झाला नाही, तर जूनमध्येच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा गेल्या पावसाळ्यात ४७ टक्क्यांवर होता. यामध्ये डाव्या व उजव्या या दोन्ही कालव्यांतून सिंचनासाठी दोन वेळा पाणी सोडण्यात आले. यावर मराठवाड्यातील ४० हजार शेतीचे क्षेत्र ओलिताखाली आले होते. त्यानंतर पाणीसाठा दीड महिना स्थिर राहिला. मात्र, याचदरम्यान आपेगाव व हिरडपुरी या दोन बंधाऱ्यांसाठी दोन वेळा पाणी सोडण्यात आल्याने पााणीसाठा २७ टक्क्यांवर आला होता. याचदरम्यान परळीला पाणी देण्याचे नियोजन झाले. त्या वेळी जायकवाडीचा साठा २२ टक्क्यांवर होता. परळीला पाणी दिल्याने जायकवाडीचा साठा १४ टक्क्यांवर आला. त्यावर यापुढे हे पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले. यामुळे मराठवाड्याला पावसाळ्यापर्यंत पाणीटंचाई होणार नाही, असे चित्र होते.

मात्र, आता थेट उन्हाळ्याच्या शेवटी पाणीसाठा ७ टक्क्यांवर असताना दि. २० मेपासून परळीच्या थर्मलसाठी ११०० क्युसेकने पाणी देण्यात येत आहे. याचदरम्यान दोन दिवसांपूर्वी आपेगाव व हिरडपुरी या बंधाऱ्यात २०० क्युसेकने पाणी देणे सुरू आहे. हे पाणी पिण्यासाठीच असले तरी त्याचा वापर इतर घेत आहेत. शिवाय गेवराईला ६०० क्युसेकने पाणी देणे सुरूच आहे.
कालव्यामुळे पाण्याचा अपव्यय
गेवराईला धरणाच्या उजव्या कालव्यातून, तर परळीला डाव्या कालव्यातून पाणी देण्यात येत आहे. हे दोन्ही कालव्यांची अवस्था दयनीय झाली असून निम्म्यावर पाणी वाया जात आहे, तर पिण्यापेक्षा या कालव्यावरील पाण्याचा वापर धनदांडग्यांनीच सिंचनासाठी अधिक केला. यामुळे धरणाच्या पिण्याच्या पाण्याचा वापर इतरत्र जास्त होत असल्याने मराठवाड्यावर टंचाईचे संकट घांेगावत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

^सध्या परळी व गेवराईला पाणी सोडाण्यात येत आहे. त्यामुळे धरणाला पाणीसाठा २ टक्क्यांवर येईल. पाऊस वेळेवर आला नाही तर मृतसाठ्यातून पाणी उपसा करावा लागेल.
संजय भर्गाेदेव, कार्यकारी अभियंता
बातम्या आणखी आहेत...