आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० हजार लोकसंख्येच्या गावासाठी केवळ तीनच टँकर, विकतच्या पाण्यावर मदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिऊर - वैजापूर तालुक्यातील शिऊर गावाला तीव्र पाणीटंचाईची झळ बसत अाहे. २० हजार लोकसंख्येच्या गावासाठी तीनच टँकर मंजूर केल्यामुळे ग्रामस्थांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

गावात चार कोटींच्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, टंचाई काळात पाणी उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली नाही. भटाणा मध्यम प्रकल्पातून गावाला पाणी पुरवण्यासाठी सुरू केलेले चार कोटींचे पेयजल योजनेचे काम दीड वर्षापूर्वी सुरू झाले. ते अंतिम टप्प्यात असून हे काम पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतीने जानेवारीपासूनच सात टँकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु, प्रशासनाने तीनच टँकर मंजूर केले. ते अपुरे ठरत आहेत. तात्पुरत्या पाणीपुरवठ्यासाठी भटाणा मध्यम प्रकल्पात ६० फुटांच्या दोन विहीर खोदण्यात आल्या आहेत. तेथून पाच किलोमीटरची पाइपलाइन टाकली असून गावात दोन लाख लिटर आणि एक लाख लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ उभारण्यात आले आहे. गावातील ५० टक्के जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. भटाणा धरण कोरडे पडल्याने तेथे खोदलेल्या दोन विहिरीत तीन टँकरद्वारे पाणी टाकले जात आहे. मात्र, ते अपुरे पडत आहे.

ग्रामपंचायत पदाधिकारीही झाले आहेत हतबल
तहसील विभागाच्या धोरणानुसार प्रतिव्यक्ती २० लिटर दररोज पाणी पुरवणे आवश्यक आहे. मात्र, गावाची लोकसंख्या जास्त असूनही फक्त तीनच टँकर मंजूर कले आहेत. शेजारच्या खंडाळा गावासाठी सात टँकर मंजूर असून २० हजार लोकसंख्येच्या शिऊर गावाला केवळ तीन टँकर मंजूर केले असल्याने ग्रामपंचायत पदाधिकारीही हतबल झाले आहेत. नऊ वस्त्यांना पाणी पुरवणारे आणखी चार असे सात टँकरची गरज असतांना प्रशासनाने तीन टँकरला मंजुरी देऊन दुधाची तहान ताकावर भागवली आहे. प्रशासनाने तत्काळ टँकर सुुरू करावे.

पाठपुरावा सुरू
आणखी चार टँकरसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र, तांत्रिक कारण पुढे करत अधिकारी चार टँकर मंजूर करण्यास टाळाटाळ करत आहेत. सध्या तीन टँकरने एवढ्या मोठ्या गावाची तहान भागवणे कठीण झाले आहे. आणखी चार टँकरचे प्रस्ताव प्रशासनाकडे जानेवारी महिन्यातच दिले आहेत ते प्रशासनाने तत्काळ मंजूर करावे.
सुलोचनाबाई पैठणपगारे, सरपंच