आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी नव्हे, पर्यटन दौरा: विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची माजलगावात टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरत असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सामोरे जाण्याची हिंमत सरकारमध्ये नसल्यानेच मराठवाड्यात काढलेला दुष्काळी दौरा हा पर्यटन दौरा असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. तालुक्यातील वारोळा येथील तांड्यास मुंडे यांनी भेट देऊन पत्रकार परिषद घेतली.
पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे म्हणाले, दुष्काळप्रश्नी कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यास सरकार पुढे येत नाही. त्यामुळे जनतेत जाण्यासाठी त्यांना पोलिसांचे संरक्षण घ्यावे लागत आहे. सरकारमधील मंत्री हे दुष्काळ निवारणासाठी नव्हे, तर दुष्काळी पर्यटनासाठी फिरत आहे. मराठवाड्यात एवढी दुष्काळाची विदारक स्थिती असताना त्या-त्या जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांनी स्वत:च्या जिल्ह्यातील पाणी-चाराटंचाई, रोजगार हमी योजनेच्या कामाबाबत आतापर्यंत एकही आढावा बैठक घेतली नाही. यावरूनच सत्ताधारी दुष्काळाप्रश्नी किती संवेदनशील आहेत हे दिसून येते. पिण्यास पाणी नाही, जनावरांना चारा नाही. अशा परिस्थितीत जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करायच्या असतील तर शासन निर्णयात नसलेली ५ लाख रुपये अनामत रक्कम ठेवण्याची अट कशाला घातली? सरकारला दुष्काळात खरोखरच शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अन्यथा आगामी अधिवेशनात आपण तीव्र स्वरूपात या प्रश्नावर सरकारला धारेवर धरणार असून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.
दुष्काळामुळे मुलींची लग्ने गावातच लावणार
वारोळा तांड्यावरील मुलींनी दुष्काळामुळे लग्नाच्या खर्चाचा भार आई-वडिलांना सोसण्याजोगा नाही. लग्नामुळे कर्जबाजारी होऊन वडिलांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये. यासाठी तांड्यावरील मुलींनी लग्ने न करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी दुपारी एक वाजता वारोळा तांड्याला भेट दिली. ग्रामस्थांसह मुलींच्या नातेवाइकांशी संवाद साधला. तुम्ही दुष्काळ व खर्चामुळे खचून जाऊ नका. मुलींची लग्ने तुमच्याच तांड्यावर थाटामाटात करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री प्रकाश सोळंके, आमदार अमरसिंह पंडित,
सभापती नितीन नाईकनवरे, भीमराव हाडुळे उपस्थित होते.
तहसीलदारांना धरले धारेवर
काही दिवसांपूर्वी कॅनॉलला पाणी आल्याने विहिरीमध्ये पाणी सोडण्यात आले असून या विहिरीतून लोक पाणी घेऊन जात आहेत. तांड्यावरील तरुण ऊसतोडणीसाठी गेल्याने वृद्धांना दोन किलोमीटर अंतरावरून पाणी कसे आणायचे हा प्रश्न आहे. तांड्यावर यापूर्वी सुरू असलेले टँकर सुरू करा, अन्यथा तुम्ही आणि मी दोघेही हंडाभर पाणी २ किलोमीटर अंतरावरील विहिरीतून आणू, असे म्हणत मुंडे यांनी तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरले.