आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-लातूर रेल्वेच्या विस्ताराविरोधात सर्वपक्षीय नेते अन‌् संघटना रस्त्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- मुंबई-लातूर रेल्वेचा बिदरपर्यंत विस्तार केल्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध करत लातूरमध्ये सर्वपक्षीय नेते, संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शनिवारी गांधी चौकात जोरदार निदर्शने केली. हे आंदोलन म्हणजे पुढच्या मोठ्या आंदोलनाचा इशारा आंदोलन होते. पुढच्या महिन्यात रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.  
मुंबई-लातूर ही आठ वर्षांपासून सुरू असलेली रेल्वे गाडी दिवसभर लातूर स्थानकावर थांबून राहते. ही गाडी दिवसा पुण्यापर्यंत इंटरसिटी म्हणून सोडावी, अशी लातूरवासीयांची मागणी होती. मात्र आठ वर्षांत ती मंजूर करण्यात आली नाही. परंतु दोन महिन्यांपूर्वी बिदरच्या खासदारांनी ही गाडी बिदरपर्यंत सोडावी, अशी केलेली मागणी तातडीने मान्य करण्यात आली. त्याला लातूरकरांनी जोरदार हरकत घेतली आहे. अगोदरच १२५० जागा असतानाही २००० लोक प्रवास करीत असलेल्या या गाडीत नव्याने माणसे बसण्यासाठी जागा नसतानाही गाडी बिदरपर्यंत सोडल्याचा राग लातूरकरांच्या मनात आहे. त्याविरोधात तीन दिवसांपूर्वीच लातूरमध्ये सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन रेल्वे बचाव संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीने रेल्वेच्या वरिष्ठांना निवेदन देऊन रेल्वे लातूरपर्यंत ठेवण्याची मागणी केली आहे. दुसऱ्या टप्प्यात शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या रेल्वेबाबत लातूरकरांच्या तीव्र भावना आहेत. या आंदोलनात ज्येष्ठ नेते मनोहरराव गोमारे, उदय गवारे, महापौर दीपक सूळ, व्यंकट बेद्रे, मोईजभाई शेख, विक्रांत गोजमगुंडे, स्मिता खानापुरे, सपना किसवे, शिवाजी नरहरे, प्राचार्य मधुकर मुंडे, अभिजित देशमुख, बसवंत भरडे, सोनू डगवाले, राज क्षीरसागर, पप्पू कुलकर्णी, सचिन बंडापल्ले, शेखर हविले, रवींद्र जगताप, योगेश हल्लाळे, व्यंकटेश पुरी, श्रीकांत रांजणकर, प्रदीप गंगणे, रामकुमार रायवाडीकर, गोपाळ बुरबुरे आदींनी सहभाग घेतला.  

खासदारांनी केला खुलासा  
ही गाडी बिदरपर्यंत जाऊ देण्यास लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनी संमती दर्शवली होती. रेल्वेच्या बैठकीत त्यांनी याला लेखी दुजोरा दिला होता, अशी कुजबूज सुरू झाली होती. त्यामुळे खा. गायकवाड यांच्याबद्दलही रोष व्यक्त केला जात होता. मात्र शनिवारीच खासदार गायकवाड यांनी एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरून जारी केली. त्यामध्ये आपण नव्या रेल्वेसाठी प्रयत्न करीत असून लातूरची गाडी लातूरलाच राहील यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे म्हटले आहे.  
 
खासदारांचा पुतळा जाळला  
धरणे आंदोलन शांततेने सुरू असतानाच वीर योद्धा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांच्याविरोधात घोषणा देत त्यांचा पुतळा जाळला. गायकवाड यांच्या संमतीमुळेच मुंबई-लातूर एक्स्प्रेस बिदरपर्यंत सोडण्यात आली, असा आक्षेप घेण्यात येत आहे. पुतळा जाळण्यासारखे प्रकार होत असल्यामुळे रेल्वे आंदोलनाची धग आता वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पुतळा जाळण्याच्या प्रकरणात वीर योद्धा संघटनेचे श्रीकांत रांजणकर यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...