आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष यात्रा: शिवसेना मंत्र्याच्या गावात विराेधकांची बैलगाडी यात्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात रविवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व दाेन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बैलगाडीतून संघर्ष यात्रा काढली हाेती. - Divya Marathi
जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात रविवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व दाेन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बैलगाडीतून संघर्ष यात्रा काढली हाेती.
जळगाव - शेतकरी कर्जमाफीसाठी विराेधी पक्षांच्या नेत्यांनी काढलेली संघर्ष यात्रा शनिवारी जळगावात दाखल झाली हाेती. दुसऱ्या टप्प्यात निघालेली ही यात्रा रविवारी सकाळी ९.१५ वाजता पुढच्या प्रवासाला निघून सकाळी ९.४५ वाजता पाळधीमध्ये पोहोचली.
 
या वेळी विरोधी  पक्षाच्या नेत्यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात  ६० बैलगाड्यांतून यात्रा काढत शेतकऱ्यांशी संवाद साधला. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धाेरणावर अासूड अाेढत नेत्यांनी शेतकऱ्यांशी हितगुज केले. मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव तथा जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी अजित पवारांचे स्वागत केले.  

 भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी विराेधी पक्षातील नेत्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले हाेते. या प्रकाराची राज्यभर चर्चा सुरू असतानाच अाता शिवसेना मंत्र्याच्या पुत्राकडूनही त्यांचे अनुकरण करण्यात अाल्याची चर्चा अाहे.

शनिवारी रात्री ११.३० वाजता संघर्ष यात्रेचे जळगाव शहरात अागमन झाले हाेते. यात्रेतील सहभागी ११० अामदारांच्या मुक्कामाची व्यवस्था शहरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये करण्यात अाली हाेती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अामदार अजित पवार हे रात्री अभय जैन यांच्या निवासस्थानी मुक्कामाला हाेते. विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांसह अन्य नेते सकाळी ८ वाजता अजिंठा विश्रामगृहावर पाेहोचले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अास्तिककुमार पांडेय यांच्यासह काही अधिकारीदेखील विराेधी पक्षनेत्यांच्या भेटीसाठी तिथे सकाळी पाेहोचले हाेते.
 
रविवारी सकाळी ९.१५ वाजता संघर्ष यात्रेची लक्झरी बस नेत्यांना घेऊन  अजिंठा विश्रामगृहावरून पारोळ्याकडे रवाना झाली. त्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, दिलीप वळसे-पाटील, अामदार जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, जितेंद्र अाव्हाड, भाई जगताप  हे अामदारही सहभागी झाले आहेत.

 
बातम्या आणखी आहेत...