आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सगळीकडे संत्री; बाजारपेठ पिवळीजर्द..!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - मौलाना सुजाउद्दीन फ्रूट मार्केटमध्ये संत्र्याची गेल्या पन्नास वर्षांतील विक्रमी आवक होत असल्याने त्याचे भाव कोसळले आहेत. बाजारात सगळीकडे संत्रीच दिसू लागल्याने त्याने सफरचंद, डाळिंब, चिकू आदी फळांच्या विक्रीवरही प्रभाव टाकला आहे. परिणामी फळांच्या बाजारावर मंदीचे सावट जाणवू लागले आहे.
लातुरात रोज सर्व फळांची मिळून ४० टनांची आवक होत आहे. त्यात सर्वाधिक २० टनांपेक्षा अधिक संत्रा विक्रीला येत आहे. हा माल विदर्भातून येत असून त्यात राजस्थानच्या गंगानगरचीही भर पडली आहे. परिणामी भाव कोसळले आहेत. विदर्भातील नागपूर, परतवाडा, धामणगाव, करजगाव आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत संत्र्याचे विक्रमी उत्पादन काढले आहे. १० टन उत्पादनाची अपेक्षा असताना ३० टन संत्रा निघू लागला आहे. त्यामुळे आवक वाढून गतवर्षीच्या तुलनेत भाव निम्म्यावर आले आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी तिपटीने उत्पादन काढले खरे, पण दर उतरल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
महाराष्ट्रात संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन विदर्भात निघते. राज्याला येथूनच संत्र्याचा पुरवठा होतो. परंतु यंदा राजस्थानमधील गंगानगरच्या संत्र्यानेही आपल्याकडे मोर्चा वळवल्याने स्थानिकचे शेतकरी अडचणीत आले आहेत.

गंगानगरहून सरकार किन्नोज जातीचा १२ टनांचा एक ट्रक संत्रा सोमवारी लातूरच्या बाजारात दाखल झाला आहे. त्याच्या १२ िकलोच्या एका पेटीला २०० रुपयांचा भाव मिळाला तर नागपूरचा १५ ते १७ किलोचे संत्र्याचे कॅरेट २०० ते २५० रुपयांनी विक्री झाले. काश्मीरहून जवळपास १५ टन सफरचंद विक्रीला येत आहे. त्याच्या १५ किलेाच्या पेटीला ९०० ते १८०० पर्यंतचा भाव मिळू लागला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात उत्पादित झालेले चिकू २० ते २५ रुपये किलोने विक्री होत आहेत.
उन्हासोबत अननस वधारणार
केरळमध्ये उत्पादित झालेले अननस सोलापूर आणि नांदेडहून लातूरच्या मार्केटमध्ये दाखल हाेत आहे. त्याची रोज दोन टन आवक होत असून त्याच्या एका िकलोला १५ ते १६ रुपयांचा भाव मिळू लागला आहे. सुरू असलेले दर कमीच आहेत. उन्हाची तीव्रता वाढण्याबरोबरच त्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
फळबाजारात मंदी
^
संत्र्याचे उत्पादन वाढल्याने अन्य फळांची विक्रीही प्रभावित झाली आहे. आवक जास्त झाल्यामुळे ग्राहक आणि किरकोळ व्यापाऱ्यांचा फायदा होत असला तरी शेतकरी आणि कमिशन एजंट अडचणीत आले आहेत. मोठ्या प्रमाणात येणारा माल दररोज खपेलच, याची शाश्वती नाही. तरीही प्रतिष्ठा जपण्यासाठी आलेला माल उतरून घ्यावा लागत आहे. एकूणच फळ बाजारावर मंदीचे सावट आहे.
जाकीर हाजी हुसेन बागवान, सचिव, फ्रुट मार्केट, लातूर
बातम्या आणखी आहेत...