आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Order: Give Holiday To Private Employers For Voting

खासगी नोकरदारांना मतदानासाठी सुटी देण्याचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी शासकीय नोकरदारांप्रमाणेच खासगी व्यापारी प्रतिष्ठानातील कामगारांनाही शासनाने सुटी देण्याचे निर्देश दिले आहेत. ही सुटी दिल्यानंतर कामगारांचे वेतन न कापण्याबाबतही बजावण्यात आले आहे. मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून या संदर्भातील परिपत्रक निर्गमित
करण्यात आले आहे.

निवडणुकीत मतदान करण्यासाठी शासनाकडून सुटी देण्यात येते. मात्र, ही सुटी "एन्जाॅय' करण्यासाठी घालवली जात होती. यामुळे मतदानाचे प्रमाण घटण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून शासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. निवडणुकीतील मतदान वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. इच्छा असूनही मतदान करता येत नसलेले अनेक मतदार आहेत. त्यांच्या मनात मतदान करण्याची ओढ असते. मात्र, पर्याय नसल्याने त्यांना मतदानापासून दूर राहावे लागते. यामध्ये दुकाने, हॉटेल, मॉल यासारख्या प्रतिष्ठानामध्ये काम करणा-या नोकरांचा समावेश आहे. केवळ रोजची रोजंदारी बुडू नये, या काळजीपोटी त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागते. आता त्यांना दिलासा देण्याचे काम शासनाने केले आहे. या संदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये निर्देशित केल्यानुसार प्रत्येक खासगी प्रतिष्ठानांच्या कामगारांना मतदान करण्यासाठी मालकांना सुटी द्यावी लागणार आहे. यामुळे निश्चितच मतदानाचा टक्का आणखी वधारण्याची शक्यता आहे.

लोकसभेचा टक्का वाढला
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढण्याच्या दृष्टीने शासनाकडून मोठे प्रयत्न करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात आलेली यंत्रणा व बीएलओंनी (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) केलेल्या कामाचा परिपाक म्हणून मतदान करणा-यांच्या संखेत लक्षणीय वाढ झाली होती. यामुळे प्रशासनाचा आत्मविश्वास दुणावला आहे. खासगी कामगारासंदर्भातील शासन निर्णयामुळे प्रशासनाला बळ मिळणार आहे.

जनजागृती नाही
शासनाने हे परिपत्रक निर्गमित करून तीन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, यासंदर्भात शासनाकडून कोणतीही जनजागृती करण्यात आलेली नाही. यामुळे या संदर्भात बहुतांश कामगार व प्रतिष्ठानांच्या प्रमुखांंनाही माहिती नाही. यामुळे याचा कितपत प्रभाव पडेल, याबाबत साशंकता आहे.

वेळ द्यावा लागणार
नियमानुसार मतदानादिवशी सुटी दिल्यास कामगारांच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्याप्रमाणात नुकसान होणार असल्यास पूर्ण सुटी नाही दिल्यास चालणार आहे. मात्र, मतदानासाठी दोन तास किंवा त्यापेक्षाही अधिक पुरेसा वेळ कामगारांना
द्यावा लागणार आहे.

वेतन कपात नाही
कामगारांना किंवा खासगी प्रतिष्ठानातील नोकरांना सुटी दिल्यानंतर प्रमुखांना त्यांच्या वेतनामध्ये कपात करता येणार नाही. तसेच अंशत: रक्कमही कापण्यात येऊ नये, असे निर्देश आहेत.