आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवयव दान: नांदेडात ग्रीन कॉरिडॉर, अवघ्या 11 मिनिटांत यकृत मुंबईकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेळ १०:४८
नांदेड येथील ब्रेनडेड तरुणाचे अवयव जलद गतीने घेऊन जाण्यासाठी डॉक्टरांनी नियोजनपूर्वक परिश्रम घेतले.

वेळ ११:०६
गुरुवारी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. अवघ्या ११ मिनिटांत ही वाहतूक यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने यशस्वी प्रयत्न केले.

वेळ ११:१४
हे अवयव एअर अॅम्ब्युलन्सने मुंबई व औरंगाबादला पाठवण्यात आले. छाया : विजय होकर्णे, नांदेड

नांदेड- मागील आठवड्यात सुधीर रावळकर यांच्या अवयवदान व अवयवाच्या वाहतुकीमुळे चर्चेत आलेल्या नांदेड शहराने बुधवारी पुन्हा ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून अवयवदानाच्या कार्यात एक नवा इतिहास रचला आहे. कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील संतोष मोरे (२८) या अपघातामुळे ब्रेनडेड झालेल्या तरुणाचे यकृत चेन्नईतून मुंबईत आणलेल्या रुग्णाला देण्यात आले. यासाठी नांदेड शहरात सकाळी १० ते ११ या वेळेत विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय ते गोवर्धन घाट पूल, वजिराबाद, व्हीआयपी रोड, राज कॉर्नर ते विमानतळ असा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात येऊन ११ मिनिटे या विक्रमी वेळेत रुग्णाचे यकृत एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आले. यापूर्वी हेच अंतर कापण्यासाठी १३ मिनिटे लागली होती.

पानशेवडी (ता. कंधार) येथील संतोष उद्धव मोरे हा तरुण नातेवाइकांना भेटण्यासाठी जात असताना मारतळा येथे त्याची मोटारसायकल उभ्या टिप्परला धडकल्याने डोक्याला मार लागला. त्यामुळे तो कोमात गेला, त्याला नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तेथून संतोषला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले होते. ही माहिती संतोषच्या गरोदर पत्नीला दिली असता तिचा रक्तदाब वाढल्याने तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. संतोषचे वडील, भाऊ व पत्नीशी चर्चा केल्यानंतर त्यांनी अवयवदान करण्यास संमती दिली. त्यासाठी बुधवार, २६ ऑक्टोबर रोजीच ग्रीन कॉरिडॉर तयार करून संतोषचे अवयव काढून अन्य गरजू रुग्णांना देण्याचे ठरले होते. मात्र, यकृत ज्या रुग्णाला द्यायचे होते तो रुग्ण चेन्नईत असल्यामुळे अगोदर त्याला मुंबईत हलवण्यात आले व त्यानंतरच म्हणजे गुरुवारी ग्रीन कॉरिडॉर करून संतोषचे यकृत, किडनी हे अवयव काढून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे विमानाने मुंबईला रवाना करण्यात आले.

पोलिस, जिल्हा प्रशासनासह मनपाचा पुढाकार : शहरात ग्रीन कॉरिडॉरसाठी गुरुवारी सकाळपासूनच पोलिस अधीक्षक संजय ऐनपुरे, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे, महेंद्र पंडित यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी विष्णुपुरी ते विमानतळ मार्गावर चोख बंदोबस्त लावला होता. यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी हेही परस्थितीवर नजर ठेवून होते. मागच्या वेळी मोकाट जनावरे अॅम्ब्युलन्सच्या मार्गात आल्याने अडथळा आला होता. तो अनुभव लक्षात घेऊन मनपा कर्मचाऱ्यांनी अगोदरच मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला होता.

देणाऱ्याने देत जावे..: संतोष मोरे हा तरुण मनमिळाऊ स्वभावाचा होता. सामाजिक कार्यातही तो अग्रेसर असायचा. तो मुंबईत माझगावला खासगी कंपनीत टेक्निशियन म्हणून कामाला होता. दिवाळी व पत्नीचे बाळंतपण यासाठी तो गावी पानशेवडीला आला होता. चार वर्षांपूर्वी त्याचा विवाह गावात सामुदायिक सोहळ्यात झाला होता. त्याने आतापर्यंत २१ वेळा रक्तदान केले आहे. मृत्यूनंतरही अवयवदान केल्याने देणाऱ्याने देत जावे.. या म्हणीचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.

अपत्यप्राप्तीचे सुख पाहण्यापूर्वीच काळाने हिरावले: संतोष व भाग्यश्री यांचा विवाह २०१२ मध्ये झाला होता. चार वर्षांनंतर या दांपत्यास अपत्य होणार होते. भाग्यश्री या गर्भवती असल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता भाग्यश्री यांना मुलगी झाली. मात्र, या मुलीचे तोंड पाहण्यापूर्वीच संतोष मोरे यांना काळाने हिरावून नेल्याने पानशेवडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, पानशेवडीत अंत्यसंस्कार.....
बातम्या आणखी आहेत...