आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवयवदान; रावळकर कुटुंबीय मदतीपासून वंचित; सुधीर होते कुटुंबात एकमेव कमावते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुधीर रावळकर यांचा बहीण चंदा रावळकर यांच्यासमवेतचा फोटो. - Divya Marathi
सुधीर रावळकर यांचा बहीण चंदा रावळकर यांच्यासमवेतचा फोटो.

नांदेड- नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच सुधीर रावळकर यांचे अवयवदान करण्यात आले. त्यासाठी नांदेड शहरात पहिल्यांदाच विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय ते विमानतळ असा ग्रीन कॉरिडॉरही तयार करण्यात आला होता. अवयवदानाचा हा निर्णय सुधीर यांच्या कुटुंबीयांनी घेतल्याने व सुधीर हे त्यांच्या कुटुंबात एकमेव कमावते असल्याने त्यांच्या पत्नीस नोकरी देण्याचे व मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे प्रशासनाने आश्वासन दिले होते. मात्र, आज वर्षभरानंतरही सुधीर रावळकर यांचे कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित असल्याची खंत सुधीर रावळकर यांच्या भगिनी चंदा रावळकर यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.   


मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये सुधीर रावळकर यांना अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले होते. सुधीर यांच्या कुटुंबीयांना अवयवदानाचे महत्त्व पटल्याने त्यांनी अवयवदानास होकार दिल्याने सुधीर यांचे अवयव औरंगाबाद, चेन्नई, मुंबई येथील गरजू रुग्णांना देण्यात आले. नांदेड जिल्ह्यातून पहिल्यांदाच अवयवदान झाल्याने नांदेडचे नाव महाराष्ट्रात ठळकपणे पुढे आले. त्याबरोबरच या मोहिमेत महत्त्वाची भूमिका असल्याने सुधीर रावळकर यांच्या पत्नीला शासकीय नोकरी देणे व त्यांच्या सात वर्षांच्या मुलीचा शिक्षणाचा खर्च उचलण्याचे प्रशासनाने आश्वासन दिले होते. आज या घटनेला वर्ष उलटून गेले तरीही शासकीय पातळीवरून सुधीर रावळकर यांच्या कुटुंबीयांना कुठलीही मदत देण्यात आलेली नाही.   

 

कुटुंबात कर्ता पुरुषच नाही   
रावळकर यांच्या कुटुंबात पुरुष व कमावता असा सुधीरच होता. त्याच्या वडिलांचे २०१४ मध्ये निधन झाले. त्याला दोन बहिणी आहेत. चंदा रावळकर या त्यांच्या भगिनीच्या यजमानांचेही २००४ मध्ये निधन झालेे. त्यांच्या कुटुंबात एकमेव पुरुष म्हणून सुधीरच होता. 

 

कुटुंबीयांना मदत मिळाल्यास  अवयवदान चळवळीस बळ

अवयवदान करणाऱ्याच्या कुटुंबीयांना जर शासकीय पातळीवरून मदत झाली तर अवयवदानाच्या या चळवळीला नक्कीच बळ मिळेल. मात्र, त्यांच्या पदरी जर निराशा येत असेल तर भविष्यात अवयवदानासाठी ब्रेनडेड झालेल्यांचे नातेवाईक पुढे येणार नाहीत.

 

मंठा येथील बुधवंत कुटुंबाचीही उपेक्षा   
जालना जिल्ह्यातील मंठा येथील बुधवंत कुटुंबीयांनीही त्यांच्या मुलाचे अवयवदान केले होते. बुधवंत हेही घरातील कर्ते होते. त्यांच्या जाण्याने त्यांचेही कुटुंबीय उघड्यावर आले होते. बुधवंत यांच्या कुटुंबीयांना तर रेशनवरील धान्यही मिळाले नसल्याची खंत त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्याची आठवण चंदा रावळकर यांनी सांगितली. बुधवंत कुटुंबिय देखील मदतीपासून वंचित आहे. 

बातम्या आणखी आहेत...