आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादचे दरोडेखोर सीसीटीव्हीमुळे अजिंठ्यात जेरबंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा - मोबाइल टॉवर परिसरात चोरी करणा-या तीन दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमे-यावरून हे दरोडेखोर अलगद जाळ्यात अडकले. विशेष म्हणजे मुंबईतील रिलायन्सच्या कंट्रोल रूममधून अजिंठा पोलिसांना चोरी होत असल्याची माहिती देण्यात आली. अजिंठा पोलिसांनीही तत्परता दाखवत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. ही घटना सिल्लोड तालुक्यातील बाळापूर पसिरात सोमवारी रात्री घडली.


शंकर रघुनाथ चव्हाण (25, गोजवाडा), मधुकर उजन्या चव्हाण (55), सदाशिव उजन्या चव्हाण (45, दोघे रा. झिन्नर, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील बाळापूरजवळ रिलायन्स कंपनीचा टॉवर आहे. बॅटरी, डिझेलसह अन्य साहित्यासाठी तीन खोल्याही बांधण्यात आल्या आहेत. दरोडेखोरांनी बॅटरीची खोली फोडून आत प्रवेश मिळवला. चोरी होत असल्याचे सीसीटीव्ही कॅमे-याच्या माध्यमातून रिलायन्सच्या मुंबई कार्यालयास कळले. मुंबई कार्यालयातून अजिंठा पोलिसांना यासंदर्भात तातडीने माहिती देण्यात आली. अजिंठा येथे मोगलशहावली बाबांचा उरूस सुरू आहे. कव्वालीच्या कार्यक्रमात बंदोबस्ताला असलेले अजिंठ्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, फौजदार सुभाष कानोडजे, अजित शेकडे आदी बाळापूरला पोहोचले. पोलिसांचे पथक टॉवरजवळ जाताच लाइटच्या उजेडामुळे दरोडेखोर सावध झाले. बचावासाठी ते बाजूच्या झुडपात दडून बसले. पोलिसांनीही माघार न घेता कसून शोध घेतला व तिघांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी रिलायन्स कंपनीचे विभागीय अधिकारी पुंडलिक नामदेव ढाकरे यांनी फिर्याद दिली.


दगडफेकीत तीन पोलिस जखमी
घटनास्थळी चोर-पोलिसांचा खेळ रंगला. बचावासाठी दरोडेखोरांनी दगडफेक केली. या दगडफेकीत अंकुश बागल, इसरार मिर्झा, अजित शेकडे हे पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले.


कुलपात सेन्सर
आरोपी बॅटरीची खोली उघडत असताना कुलपात असलेल्या सेन्सरमुळे मुंबई कार्यालयात याची सूचना गेली. कुलूप तोडल्यानंतर आत शिरताच मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात ते कैद झाले. यानंतर सर्व सूत्रे तातडीने हलल्यामुळे आरोपींना पकडण्यात आले.


आरोपींवर 7 गुन्हे
या आरोपींविरुद्ध उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, वाशी, करमाळा, येरमाळा, शिराढोण आदी ठिकाणी जबरी चोरी, घरफोडी अशा सात ते आठ गुन्ह्यांची नोंद आहे.