आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब ! उस्मानाबाद शहरातून उचलला 60 टन 14 किलो कचरा, 30 किमीची सफाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - एकट्या उस्मानाबाद शहरात ६० टन १४ किलो कचरा असू शकतो, याची कल्पनाही करता येत नाही. मात्र, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी (दि. १) राबवण्यात आलेल्या शहर स्वच्छता अभियानातून इतका कचरा जमा झाला, हे वास्तव आहे.  विशेष म्हणजे कचरा तसाच न ठेवता ४१ वाहनांतून शहराबाहेर हलवण्यात आला आहे. एका पैशाचाही मोबदला न घेता घरातून शिदोरी बांधून आलेल्या तीन हजार १६८ श्री सदस्यांनी शहर स्वच्छ करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.   

सकाळची आठची वेळ, शहर नुकतेच झोपेतून जागे झाले होते. काही जण सकाळची कामे उरकण्यात, तर काही जण सर्व आटोपून कामाच्या ठिकाणी जाण्याच्या गडबडीत होता. सर्वांनाच आपल्या गल्लीत हातात, झाडू, कुदळ, फावडे घेऊन जाणारे लोक दिसत होते. 
 
सर्व जण आश्चर्याने पाहत आपल्या कामांसाठी पुढे जात होते. मात्र, कोणाच्याही काैतुकाची किंवा विचारपूस करण्याची अपेक्षा न करता राबणाऱ्यांचे हात राबत हाेते. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांचे ते हात होते.  

प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सकाळी आठपासून शहरातील पोस्ट आॅफिस, बसस्थानक, पंचायत समिती, शहर पोलिस ठाणे परिसर, पोलिस अधीक्षक कार्यालय परिसर, समातानगर, शिवाजी चौक, जिजामाता चौक, नेहरू चौक, उस्मानाबाद – तुळजापूर रस्ता, आंबेडकर पुतळा परिसर, अण्णाभाऊ साठेनगर, गणेशनगर आदी भागात स्वच्छता अभियान राबवले. आठपासून सुरू करण्यात आलेले अभियान दुपारी एकपर्यंत सुरू होते. सहा तास राबून सदस्यांनी सुमारे ६० टन १४ किलो कचरा गोळा केला. कचरा नेण्यासाठी नगरपालिका व प्रतिष्ठानच्या ४१ वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. जमा झालेले कचऱ्याचे ढीग पुन्हा हवेमुळे विखरून जाऊ नयेत यासाठी तातडीने वाहनात टाकले जात होते.

बसस्थानकात आठ टन कचरा   
उस्मानाबादच्या बसस्थानकामध्ये आठ टन कचरा बाहेर काढण्यात आला. जवळच्या काही हॉटेल व दुकानांमध्ये बसस्थानकाच्या समोरील नालीमध्ये कचरा टाकण्यात येत होता. तेथेही श्री सदस्यांनी स्वच्छता केली. या वेळी आठ टन कचरा स्वच्छ करण्यात आला.

दासबोधाची शक्ती   
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने देशात विविध ठिकाणी साप्ताहिक बैठका (सत्संग) घेण्यात येतात. यामध्ये समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचे वाचन व निरूपण करण्यात येते. तसेच चिंतनिकेच्या माध्यमातून धर्मसेवा, समाजसेवा सांगितली जाते. अशा बैठकांमध्ये मिळालेली ‘आज्ञा’ शिरसावंद्य मानून सदस्यांची स्वच्छतेसाठी झोकून दिले.   

साहित्यही आणले   
स्वच्छता करण्यासाठी कोणत्याही अन्य यंत्रणेकडून अपेक्षा न करता सदस्यांनी स्वत:चे साहित्य अाणले होते. खराटे, झाडू, टोपले असे साहित्य त्यांनी आणले. सदस्यांनी शहरातील अनेक ठिकाणच्या तुंबलेल्या नाल्याही साफ केल्या. प्रत्यक्ष नालीत उतरून त्यातील अडकलेला मैला बाहेर काढला जात होता.   
बातम्या आणखी आहेत...