आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Osmanabad Close For Maratha And Muslim Reservation Issue

कडकडीत बंद; मराठा- मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा सरकारचा निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने दोन्ही समाजांच्या वतीने सोमवारी जिल्हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदला उस्मानाबादेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरामध्ये कुठलीही अनुचित घटना घडली नाही.
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली असून, मुस्लिम समाजाला देण्यात आलेले नोकरीतील आरक्षण स्थगित ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात चार दिवसांपासून दोन्ही समाजांमध्ये संताप निर्माण झाला आहे. राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडण्यास कमी पडले, असा आरोप विविध मराठा संघटनांनी केला आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी उस्मानाबादेत रास्ता रोको करण्यात आला होता. सोमवारी सकाळी मराठा-मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने शहर बंदसाठी आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. दोन्ही समाजांतील कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकामध्ये एकत्रित आल्यानंतर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना निवेदन देण्यात आले.
गुरुवारी "छावा'चा लातूर बंद
लातूर- येथील अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने गुरुवारी लातूर बंदचे आवाहन केले आहे. यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट असून या समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. ते मिळेपर्यंत मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू न देण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा
मराठा आणि मुस्लिम समाजाला देण्यात आलेले आरक्षण पूर्ववत ठेवावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शासनाला दिले आहे. मराठा समाजावर अन्याय झाला असून, समाजाच्या आंदोलनास आमचा पाठिंबा आहे, असे निवेदन देण्यात आले आहे.
महिला संघटनेचेही मुख्यमंत्र्यांना निवेदन
मराठा समाजाच्या आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी मराठा महिला आरक्षण कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयापर्यंत महावितरणने केलेल्या मेगा भरतीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर समितीच्या शीलाताई उंबरे, नंदाताई पनगुडे, ज्योतीताई सपाटे, अॅड. वैशाली देशमुख यांच्या स्वाक्षरी आहेत.
नांदेड : आरक्षणावरून वातावरण तापले
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्यास सुरुवात झाली. शहरात सोमवारी आरक्षण समर्थक संघटनांनी बंदचे आवाहन केले. बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
छावा, संभाजी ब्रिगेड, डॉ. विखे पाटील कृषी परिषद, मानिनी महिला मंडळ आदी संघटनांनी सोमवारी बंदचे आवाहन केले. आरक्षण समर्थकांनी सकाळी शहरातून मोर्चा काढला. माधव देवसरकर, संतोष गव्हाणे, पंजाब काळे, दशरथ कपाटे, संकेत पाटील, दीपक सूर्यवंशी, गणेश शिंदे, स्वप्निल जाधव यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चामध्ये जवळपास ३०० समर्थक सहभागी झाले. शिवाजीनगर, वजिराबाद, महावीर चौक, जुना मोंढा या भागातून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. बंदचा बस वाहतुकीवर, शाळा, महाविद्यालयांवर कोणताही परिणाम झाला नाही. सिडकोमध्येही संतोष कवाळे यांच्या नेतृत्वात छावा संघटनेने बंदचे आवाहन केले.