आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत महसुली दस्त एका क्लिकवर; निजामकालीन उर्दू भाषेतील दस्तही मिळणार क्षणात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - येथील तहसील कार्यालयातील सर्व महसुली दस्तांचे संगणकीकरण सुरू करण्यात आले आहे. यामुळे आता तहसील कार्यालयात असलेले जुने दस्त एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. निजामकालीन उर्दू भाषेतीलही दस्त मिळणार असून ग्रामीण भागातील शेतक-यांचे नकलांसाठीचे खेटे आता वाचणार आहेत.
येथील तहसील कार्यालयामध्ये सुमारे 60 वर्षांपासूनचे दस्त जतन करून ठेवण्यात आले आहेत. यामुळे येथील रेकॉर्ड रूममध्ये मोठ्याप्रमाणात कागदपत्रांचे गठ्ठे करून ठेवावे लागत आहेत. हे दस्तांचे गठ्ठे सांभाळताना कर्मचा-यांच्या नाकीनऊ येत आहेत. दररोज स्वच्छता करणे व वाळवीपासून सुरक्षा करताना कर्मचा-यांना कसरत करावी लागते. मागणीनुसार शोधतानाही मोठा त्रास सहन करावा लागतो. आता या त्रासापासून मुक्तता होणार आहे.

महसुली अभिलेख अद्ययावत व संगणकीकरण उपक्रमातून येथील सर्व दस्तांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. दस्तांच्या स्कॅनिंग प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी येथील तहसीलदार सुभाष काकडे व नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 2) कागदपत्रांची स्कॅनिंग सुरू करण्यात आली आहे. तहसील कार्यालयात स्कॅनिंगच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. येथील सर्व कागदपत्र स्कॅन करण्यात येत आहेत. खासरा पाणी, जुने सात बारा, फेरफार, कुळाचे कागदपत्र, गावठाण रेकॉर्ड, पाहणीपत्रक आदी दस्त स्कॅन करण्यात येत आहेत. यासाठी विशेष कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेगाने ही प्रक्रिया पूर्ण होत आहे. या प्रणालीमुळे आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळण्यास मदत होणार आहे.

कार्यालयातील खेटे वाचणार
येथील तहसील कार्यालयात नकलेसाठी अर्ज सादर केल्यानंतर शेतकरी किंवा अन्य नागरिकांना नक्कल हातात पडेपर्यंत कार्यालयात फे-या माराव्या लागतात. सातत्याने नकला देण्याची तारीख वाढवून दिली जात असल्यामुळे अर्जदार त्रस्त होत आहेत. आता नवीन प्रणाली विकसित झाल्यानंतर काही क्षणात नक्कल मिळणार असल्यामुळे अर्जदाराचा त्रास वाचणार आहे.

कर्मचा-यांनाही दिलासा
येथील रेकॉर्ड रूममध्ये दस्ताचा शोध घेताना कर्मचा-यांनाही त्रास सहन करावा लागतो. काही वेळा दस्ताचा शोध म्हणजे डोक्याची कटकट बनते. कागदपत्रांचे बाड शोधताना कर्मचा-यांच्या नाकीनऊ येतात. संगणकीय प्रणाली सुरू झाल्यावर कर्मचा-याचीही ही कटकट कमी होणार आहे. यामुळे त्यांनाही दिलासा मिळाला आहे.

ई - फेरफार अंतिम टप्प्यात
फेरफार करून सातबारा उता-यावर मालकी हक्कावर नोंद घेण्याची प्रचलित पद्धती अत्यंत वेळखाऊ आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी, विक्री व्यवहाराचा दस्त नोंदवल्यानंतर सर्व दस्त व अर्ज तहसील कार्यालयात द्यावा लागतो. मंडळ अधिका-यांमार्फत सुनावणी घेऊन फेरफाराची नोंद केली जाते. ही प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ व गैरसोयीची आहे. आता ई - फेरफार पद्धती विकसित करण्यात आली आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आहे. निबंधकांकडे दस्ताची नोंदणी झाल्यावर तहसील कार्यालयात याची सूचना ऑनलाइन पद्धतीने मिळेल. यानंतर दस्त लिहून देणार व घेणार यांना नोटीस पाठवून तत्काळ फेरफार नोंद होणार आहे.

स्कॅनिंगनंतर प्रणाली सुरू
सर्व स्कॅनिंग झाल्यानंतर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. संगणकावर क्लीक केल्यानंतर काही क्षणातच दस्त उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील 128 गावांतील दस्तांची नोंदणी वेगाने केली जात आहे.
कागदपत्रांचे एकत्रीकरण
बहुतांश ठिकाणचे महसुली दस्त तलाठी सज्जाच्या कार्यालयात आहेत. यामुळे बहुतांशवेळी शेतक-याची तलाठी व तहसील कार्यालयातून टोलवा टोलवी होते. आता एकाच ठिकाणी नक्कल मिळणार असल्याने हा प्रकार थांबणार आहे.

उर्दूभाषेच्या कागदपत्राची नोंद
हैदराबाद राज्य अस्तित्वात असताना उर्दू भाषा प्रचलित होती. त्यावेळेसचे महसुली दस्त आजही उपयोगात येतात. मात्र, हे दस्त जीर्ण झाले आहेत. फार काळ ते अस्तित्वात राहण्याची शाश्वती नाही. मात्र, स्कॅनिंग पद्धतीमुळे हे दस्त कधीही उपलब्ध होणार आहेत. याचा न्यायालयीन कामकाजासाठी मोठा उपयोग होणार आहे.

काम प्रगतिपथावर
तहसील कार्यालयात संगणकीय दस्त लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहेत. स्कॅनिंग प्रक्रिया वेगात सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महा ई सेवा केंद्रातूनही कोणतेही दस्त काढता येणार आहेत. या प्रक्रियेमुळे अर्जदार व कर्मचारी दोघांचीही सोय होणार आहे.’’
राजेश जाधव, नायब तहसीलदार