आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Osmanabad District Administration Work On Prevent Migration

स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन लागले कामाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - १९७२ च्या दुष्काळात अन्न नव्हते, आता अन्न मिळेल, पण पाण्यासाठी २०१३ च्या दुष्काळासारखी गत होईल. जनावरांच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागेल, सलग तीन वर्षांपासून हातची पिके जात आहेत. प्रचंड कर्ज वाढले आहे, जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातून महानगराकडे स्थलांतर होण्याची शक्यता आहे. स्थलांतर होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गावातच रोजगार आणि पिण्याचे पाणी पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा शेतीवर अवलंबून आहे. मोठे उद्योग नाहीत, कारखाने नाहीत, त्यामुळे रोजगाराचे अन्य साधन नाही. मात्र, तीन वर्षांपासून पावसाची अवकृपा होत असल्यामुळे शेतीचे गणित कोलमडून गेले आहे. होत्या त्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. दुभती जनावरे कमी झाली असून हंगामी पिकेही वाया जात आहेत. २०११ पासून शेतक-यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव घेत नाही. पाऊस नाही म्हणून शाश्वत पाणी नाही. पाणी नाही म्हणून बागायती शेती नाही, अशी स्थिती सर्वसाधारपणे जिल्ह्यातील आठही तालुक्यांत पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी (२०१३) जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला होता. त्यामुळे २०१३ च्या भयाण दुष्काळाने होरपळलेल्या जिल्ह्यातील शेतक-यांना उभारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, खरिपाच्या पिकातूनही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यानंतर रब्बीतून काही हाती येईल, अशी अपेक्षा असलेल्या शेतक-यांच्या आशेवर गारपीट आणि अवकाळी पावसाने पाणी फेरले. यावर्षीच्या खरिपाला पेरणीपुरताही पाऊस झाला नाही.

अशी आहे स्थिती
> जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ४० हजार हेक्टर असले तरी यावर्षी प्रत्यक्षात तीन लाख हेक्टरवर पेरणी झाली. त्यापैकी एक लाख ४० हजार हेक्टरवरील सोयाबीनमधून शेतक-यांना खर्चही मिळू शकला नाही. एक लाख ६० हजारांहून अधिक हेक्टवरील सोयाबीनचा एकरी उतारा तीन ते पाच क्विंटल निघाला.
> खरिपानंतर आता रब्बी साथ देईल, अशी अपेक्षा असताना परतीचा पाऊस न आल्याने रब्बीच्या उत्पन्नाचीही आशा मावळली.

मुलाच्या लग्नासाठीही पैसे नाहीत
मुलीच्या लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून शेतक-यांच्या वेदना सर्वसाधारणपणे ऐकायला मिळतात. मात्र, निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतक-यांच्या मुलींप्रमाणेच मुलांच्या लग्नाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी मुलगा नको, ही मानसिकता असतानाच मिळाली तर लग्नाचा भारही पेलण्याची ताकद शेतक-यांजवळ उरलेली नाही. उस्मानाबाद तालुक्यातील भानसगाव येथील शेतकरी हनुमंत पाटील यांच्या मुलाचा विवाह डिसेंबर महिन्यात ठरला आहे. त्यांनी एक एकर सोयाबीन पेरले होते. त्यासाठी नऊ हजार रुपये खर्च केले. शेतातून त्यांना ३५ हजारांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, हाती आले आहेत केवळ १० हजार रुपये. आता विवाहाचा खर्च कसा करायचा, उसनवारी किती करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

अशीच स्थिती याच गावातील शेतकरी चंद्रकांत पवार यांची झाली आहे. व्यवसायाने वाहन चालक असलेले पवार यांनी शेतात खरिपासाठी १० हजार रुपये खर्च केले होते. त्यांच्या हातात केवळ सहा हजार रुपये आले आहेत. पाटील, पवार ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.