आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोरंजनातून शिक्षण देणार्‍या हसमुखरावांनी विद्यार्थ्यांना लावला लळा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद: मनोरंजनातून शिक्षण देणार्‍या हसमुखरावांनी सातेफळ (ता. कळंब) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लळा लावला आहे. हसमुखरावांच्या सूचनांचा आदर करणार्‍या विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमात प्रगतीची वाट धरली असून संस्कारामुळे मानसन्मान, वैयक्तिक स्वच्छता, एकता राखली जात आहे.
या शाळेतील शिक्षक उदय पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या शाळेतील बहुतांश विद्यार्थी शाळेला दांडी मारायचे. उपस्थिती वाढावी यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी मुलांसाठी आकर्षण असणार्‍या बाहुल्यांच्या माध्यमातून शिकवण्याचा निर्णय घेतला. आपल्या शाळेत हसमुखराव (बाहुल्या) शिक्षण देऊ लागले आहेत, असा संदेश गेल्यानंतर गैरहजर राहणारे विद्यार्थी शाळेत येऊ लागले. बाहुलीच्या माध्यमातून हसमुखराव आपल्याला शिकवत असल्याचे पाहून विद्यार्थी भारावून गेले. गणित, इंग्रजीसारख्या विषयांबरोबरच सामान्यज्ञान, वैयक्तिक स्वच्छता, आदर, मानसन्मान, बधुभाव असे संस्कारक्षम विचारही हसमुखरावांनी विद्यार्थ्यांना दिले. हसमुखरावांची गोडी लागल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. उदय पाटील यांनी स्वत: नकळत आवाज क ाढून विद्यार्थ्यांना हसमुखराव (बाहुली) बोलत असल्याचे भासवत गणित, इंग्रजीसारखे विषय सोपे करून दाखवले. हसमुखरावांचा शब्द प्रमाण मानणारे विद्यार्थी अलीकडे शाळेला चुकूनही दांडी मारण्याचा विचार करत नाहीत. त्यांना जणू हसमुखरावांचा लळा लागला आहे. मुलांना लागलेल्या अभ्यासाच्या गोडीमुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होत असल्याचे पालक सांगतात.