आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मला माझा भैया परत द्या हो.. शहीद जावळे यांच्या बहिणीचा टाहो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - ‘मला आता काहीही नको, मला माझा भैया परत द्या हो’, असा मन हेलावून टाकणारा आक्रोश करणारी शहीद उमेश जावळे यांची बहीण वंदना पार्थिव गावात आणल्यानंतर भोवळ येऊन जमिनीवर कोसळली. उमेश आई- वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या जाण्यामुळे जावळे कुटुंबाचा आधार तुटला आहे.

वडील पांडुरंग उर्फ बंडू व आई द्रौपदी यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मजुरीवर चालत होता. तुराट्याच्या कुडाच्या घरात राहून दोघांनी उमेश व वंदनाला लहानाचे मोठे केले. मजुरीसोबत आपल्या दीड एकर शेतजमिनीचा थोडासा आधारही होता. उमेशला शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे वडिलांनी हलाखीची परिस्थिती असूनही मेंढा गावात प्राथमिक तर लासोना येथे माध्यमिक शिक्षण दिले.

नंतर मात्र उमेश यांनी वडिलांवर कसलाही आर्थिक भार न टाकता स्वत: पेपर टाकून तसेच मिळेल ते काम करून महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. उस्मानाबादच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये कला शाखेतून 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले. मात्र, कुटुंबाची जबाबदारीची जाणीव असल्यामुळे दि. 21 नोव्हेंबर 2010 रोजी गडचिरोली गाठून त्याने पोलिस दलात नोकरी मिळवली. तेथे नक्षलवाद्यांच्या क्षेत्रातच कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता सेवा सुरू केली.

गेल्या महिन्यातच दि. 25 मे रोजी चुलत बहिणीच्या विवाहासाठी उमेश गावात आले होते. त्यावेळी बहीण वंदनाच्याही विवाहाची तयारी सुरू करण्यास आई - वडिलांना सांगितले. त्यानुसार स्थळ पाहणी सुरू करण्यात आली होती. पुढच्या आठवड्यातच उमेश बहिणीचा विवाह जमवण्यासाठी येणार होते. यामुळे बहीण वंदनासह घरातील सर्व आनंदात होते. मात्र, नियतीने उमेश यांना हिरावून घेतले. जावळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अंत्यसंस्कारावेळी आई, वडील व बहीण वंदनाचा आक्रोश कोणालाही पाहवत नव्हता. या वेळी सर्वांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या.
काकांचे मुलाप्रमाणे प्रेम
उमेश शिक्षणासाठी वडिलांचे मावसभाऊ अरविंद रामहरी रणखांब या काकांकडे वास्तव्यास होते. आपल्या मुलांप्रमाणेच त्यांनी उमेशवर प्रेम केले होते. सकाळी उमेशच्या शहीद होण्याची बातमी समजताच त्यांना छातीत दुखू लागले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अत्यवस्थ असतानाही रणखांब अंत्यविधीसाठी मेंढा येथे आले होते.
ते दोन दिवस संपणार नाहीत
शिंगोली (ता. उस्मानाबाद) येथील नयना दत्तू वाघमारे याही पोलिस दलात भरती झाल्या होत्या. त्यांनाही वडसा पोलिस ठाण्यात पोस्टिंग देण्यात आली होती. नयना यांना उमेश यांनी दोन दिवसांनी पोलिस ठाण्यात परत येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, नयना यांना उमेश यांच्या पार्थिवासोबत मेंढ्याला यावे लागले. आता उमेश यांनी परत येण्याचे दोन दिवस कधीच संपणार नसल्याचे नयना यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

वर्षभरात तीन जवान धारातिर्थी
उस्मानाबाद जिल्ह्याला लढवय्यांची परंपरा असून, अतिरेकी किंवा नक्षल्यांच्या हल्ल्यात वर्षभरात जिल्ह्यातील 3 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये उमरगा तालुक्यातील व्हंताळ, भूम तालुक्यातील पखरुड आणि उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा येथील जवानांचा समावेश आहे. जिल्ह्यातील गुंजोटी येथे सर्वाधिक जवान असून, गावामधील 35 ते 40 जवान सध्या सैनिकपदावर कार्यरत आहेत. पखरुडमधील 5 जवान सेवेत आहेत. जिल्ह्यात 4200 सेवानिवृत्त जवान असून, एकट्या उमरगा तालुक्यात 900 जवान आहेत.
(फोटो - शहीद जवान उमेश जावळे यांना बंदुकीतून फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. )