आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Osmanabad Kangara Village Police Action Live Report

लाइव्ह रिपोर्ट : कनगरा गाव दहशतीखाली; दरोडेखोरांची नव्हे, पोलिसांचीच भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - ​ कनगरा गाव दहशतीखाली, रक्ताळलेल्या लाठ्यांची रक्तरंजित आठवण, पोलिसांच्या दंडेलीतून ग्रामस्थ अजूनही सावरले नाहीत, पोलिस महानिरीक्षकांनी दिली धावती भेट. म्हणाले, राज्य सरकारला सादर करू अहवाल; विरोधी पक्षनेते विनोद तावडे झाले आक्रमक

सोमवारी रात्री झालेल्या बेदम मारहाणीची घटना कनगरावासीयांच्या (ता.उस्मानाबाद) मनात खोलवर रुतून बसली आहे. घटनेच्या तिसर्‍या दिवशी पोलिस महानिरीक्षकांनी गावाला भेट दिली. मात्र, दडपणाखाली असलेले ग्रामस्थ अजूनही पोलिसांच्या दहशतीमधून सावरलेले नाहीत. ग्रामस्थांमध्ये एकीकडे पोलिसांबद्दल भीती, दडपण असून, दुसरीकडे प्रचंड संताप, चीड आहे. माध्यमांना भळभळत्या जखमा दाखवत बुधवारी ग्रामस्थ पोलिसांच्या रझाकारी कारभारावर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत होते.

जेमतेम 2 हजार लोकसंख्येचे कनगरा कष्टाळू प्रवृत्तीचे गाव. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे घर ते शेत, असा सर्वसाधारण ग्रामस्थांचा दिनक्रम. मात्र, गावामध्ये काही वर्षांपासून गावठी दारूचा शिरकाव झाला आणि अनेक कुटुंबे उघड्यावर आली. त्यामुळे बचत गटाच्या महिला आणि गावातील काही युवकांनी दारूच्या विरोधात मोहीम उघडली. मात्र, बेंबळी पोलिसांच्या सहकार्याने हा अवैध धंदा तेजीत होता. गावात पोलिसांविरुद्ध धुमसत असलेला संताप गावचे पोलिस पाटील वाजिद शेख यांनी बेंबळी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला होता. मात्र, पोलिस त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नव्हते. पोलिसांच्या नेहमीच्या धोरणाला एकजुटीने पुढे आलेल्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आणि प्रचंड वादंग झाले. पोलिस कर्मचार्‍यांच्या चुकीच्या धोरणाला वरिष्ठ अधिकार्‍यांनी समर्थन दिले. यातूनच ग्रामस्थांवर अत्याचार करण्यात आला. एखाद्या समाजहिताच्या कामासाठी आपल्यावर अत्याचार होईल, याची कल्पनाही ग्रामस्थांना नव्हती.

दारू विक्रेते फरार
गावामध्ये वादाला कारणीभूत ठरलेले दारू विक्रेते राठोड कुटुंबीय मंगळवारपासून फरार आहेत. त्यांच्यावरही पोलिसांवरच्या हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ग्रामस्थ अटकेत असताना दारू विक्रेते मात्र मोकाट होते. बुधवारी राठोड कुटुंंबीय गायब झाले आहेत.
निष्पाप सतीशरावांना अपंगत्व
गावातील तीन मंदिरांची पूजा करणारे 35 वर्षीय सतीश गुरव सोमवारी रात्री मुलाबाळांसह त्यांच्या घरात झोपले होते. त्यांना गावात झालेल्या वादाची कल्पनाही नव्हती. रात्री साडेबाराच्या सुमारास घराचा दरवाजा तोडून बेदम मारहाण करीत पोलिसांनी त्यांना गाडीत कोंबले. अमानुषपणे केलेल्या मारहाणीत त्यांच्या पायाच्या गुडघ्याची वाटी सरकली असून गंभीर दुखापतीनंतरही त्यांना ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी दिवसभर डांबून ठेवण्यात आले. त्यांच्या पायातून प्रचंड रक्तस्राव झाला. मात्र, उपचारही मिळू दिले नाहीत. सायंकाळी पोलिसांवर दबाव वाढल्यानंतर सतीश गुरव यांच्यावर जिल्हा रुग्णालयात तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. सतीश गुरव यांना 3 एकर जमीन असून, 3 अपत्ये आहेत. एक मुलगा हृदयविकाराने पीडित असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, ती अयशस्वी ठरल्याने त्याच्यासाठी दरमहा 5 हजार रुपयांची औषधे घ्यावी लागतात. समोर संकट असताना आता पोलिसांच्या मारहाणीने त्यांना अपंगत्व आले आहे. पाय दुुरुस्त करण्यासाठी त्यांना किमान 5 लाख रुपये आवश्यक आहेत. मात्र, त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाकडे आकांत करण्याशिवाय काहीही उरले नाही.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, पोलिसांचा निर्दयीपणा आणि आईला लाथा, वडील कोठडीत