आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Osmanabad News In Marathi, Divya Marathi, Police

पोलिसांची ग्रामस्थांना मारहाण, वाशीतील मांडव्यात अवैध दारू बंद करण्याऐवजी चालवले दंडुके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - गावात दारूबंदीसाठी गेलेल्या वाशी पोलिसांनी गुन्हेगाराप्रमाणे गावकऱ्यांना बेदम झोडपून काढत पुन्हा एकदा विकृतीचे दर्शन घडवले. निष्पाप नागरिकांना मारहाण केल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना घेराव घातला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी माफी मागत सुटका करून घेतली.

वाशी तालुक्यातील मांडवा येथे गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. यामध्ये तिघे जखमी झाले असून एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवा येथे दारूबंदी करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. मात्र, वाशी पोलिसांकडून दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी गावकऱ्यांवरच दबाव आणला जात आहे. मांडवा ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठरावही घेतला आहे. गुरुवारी सकाळी वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शहाजी शिंदे कर्मचाऱ्यांसह गावातील बसस्थानकाजवळ आले. तिथे थांबलेल्या अविनाश देशमुख, बाबा शिंदे, रमेश पाटील यांना त्यांनी ‘इथे का थांबलात,’ अशी विचारणा केली. त्यानंतर या तिघांनी ‘आम्ही शेतात चाललो आहोत,’ असे सांगितल्यानंतरही पोलिसांनी त्यांना काठीने बेदम मारहाण सुरू केली. पोलिस निरीक्षक शिंदे यांनी हातातील काठीने अविनाश देशमुख यांच्या डोक्यात जोरात
मारल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. तसेच बाबा शिंदे यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार सुरू झाल्यानंतर गावकरी एकत्र आले. २०० जणांच्या जमावाने पोलिसांच्या गाडीला घेराव घातला. त्यामुळे ‘माफ करा’ असे म्हणत पोलिसांनी जमावातून सुटका करून घेतली. गावकऱ्यांनी जखमी अवस्थेत अविनाश देशमुख, बाबा शिंदे यांना उस्मानाबादच्या जलि्हा रुग्णालयात दाखल केले. या मारहाणीमध्ये अविनाश देशमुख यांच्या मेंदूला सूज आली आहे. या प्रकरणाचा गावकऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवत गावकऱ्यांना अमानुष मारहाण करून रझाकारी दाखवणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
...तर अनर्थ घडला असता
वाशी पोलिसांनी निष्पाप गावकऱ्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केल्यानंतर गावकरी एकत्र आले. तेवढ्यात पोलिसांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांनी त्यांना घेरले होते. गावकरी संतापल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली. त्यानंतर माफी मागून पोलिसांनी स्वत:ची सुटका करून घेतली. त्यामुळे गावकरी शांत झाले, अन्यथा गावकरी विरूद्ध पोलिस असा टोकाचा संघर्ष झाला असता.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
याबाबत गावकरी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यासाठी गेले. तिथे हजर असलेल्या अतरििक्त पोलिस अधीक्षकांनी जखमींचा जबाब नोंदवून घेतला. मात्र, संबंधित पोलिस नरिीक्षकावर कुठलीही कारवाई झाली नाही.
माझी चूक झाली
^गावामध्ये काही लोक दारू विक्री करतात, तसेच कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर आमच्यावर दबाव आणला जातो. जनता विद्यालयाचे विद्यार्थी आंदोलन करणार होते. त्यामुळे आम्ही गावात गेलो. या वेळी काही लोक आम्हाला पाहून पळून जात होते. त्यांना आमच्याकडून मारहाण झाली. माझ्याकडून प्रमाद घडला. माझ्याकडून चूक झाली. गावकऱ्यांनी मला समजून घ्यावे.
शहाजी शिंदे, पोलिस निरीक्षक, वाशी
दारू विक्रेत्यांना अभय
गावामधील दारू बंद करावी यासाठी अनेक दिवसांपासून मी लढा देत आहे. मात्र, वाशी पोलिसांकडून दारूबंदीसाठी प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे गावकरी संतापले आहेत. दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिस सामान्य नागरिकांना मारत सुटले आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. सुरेश परिहार, सदस्य, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन