आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Osmanabad News In Marathi, Tuljapur, Divya Marathi

तुळजापुरात थाटलेला बनावट बिअरचा कारखाना उद्ध्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - तुळजापूर येथे सुरू असलेला बनावट बिअरचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उद्ध्वस्त केला. ही कारवाई रविवारी (दि. 17) रात्री उशिरा 11.30 वाजता करण्यात आली असून एका व्यक्तीसह 20 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

बशीर शेपन चक्कळी (42, रा. सरवदेनगर, मुळेगाव रस्ता, सोलापूर) याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. गणेश लॉजच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू होता. अत्यंत गुप्त पद्धतीने येथे बनावट बिअर तयार करण्याचे काम सुरू होते. रात्री वाहनात बाटल्या भरून अन्यत्र पोहोचवल्या जात होत्या. दिवसा या भागात कोणालाही फिरकू दिले जात नव्हते. येथील संशयास्पद हालचाली पाहून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तुळजापूरचे निरीक्षक संजय राठोड यांच्या पथकाने रविवारी रात्री 11.30 वाजता छापा मारला. बशीर चक्कळीला बनावट बिअर तयार करताना पकडले. आठ हजार 640 रुपयांच्या बाटल्या, आठ हजार रुपयांच्या दोन पॅकिंग मशीन, एक हजार 560 रुपयांचे 312 बूच, दोन हजार रुपयांचे प्लास्टिक ट्रे असा 20 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

फेकलेल्या बाटल्यांचा वापर
तुळजापूर, उस्मानाबाद शहरातील बिअर बारमधील ग्राहकांनी बिअर पिऊन फेकलेल्या बाटल्यांचा उपयोग या कारखान्यामध्ये केला जात होता. हा कारखाना सुरू होऊन एक आठवडाच झाला होता. सध्या येथे रोज 300 ते 400 बाटल्या तयार केल्या जात होत्या.

बिअरची प्रक्रिया
अमृत काढ्यासारखे आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाणारे रसायन व क्लोरोहायड्रेटसारख्या रसायनाचे मिश्रण करून बिअर तयार केली जात होती. ख-याखु-या बिअरप्रमाणे दिसण्यासाठी रंगाचा उपयोग केला जात होता. क्लोरोहायड्रेटचा अधिक वापर झाल्यास जीवितासही धोका पोहोचू शकतो, अशी माहिती राठोड यांनी दिली.