आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Osmanabad Police And Coaching Classes Initiative For Spy Cam

छेडछाड कॅमेर्‍यात कैद; उस्मानाबादेतील चौकांत फेब्रुवारीत होणार यंत्रणा कार्यान्वित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी शहरातील जिजाऊ चौकासह सर्व शैक्षणिक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. शहरातील खासगी कोचिंग क्लास चालकांनी पोलिस विभागाच्या मदतीने हा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालयातील मुलींना त्रास देणार्‍या टवाळखोरांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.
शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात असलेल्या तांबरी विभागात क्लासेसची संख्या सर्वाधिक आहे. पहाटेपासून रात्रीपर्यंत क्लासेस चालू असतात. शाळा, महाविद्यालयाच्या मुलींना क्लासेसच्या आवारात अडवून त्यांची छेड काढण्याचे प्रकार घडत आहेत. क्लास सुरू असताना बाहेर घडणार्‍या प्रकाराकडे संबंधित क्लास चालकाचे लक्ष नसते. त्यामुळे टवाळखोरांचे फावते. अनेक वेळा क्लास चालकांनाही दमदाटी केली जाते. दोन वर्षांपूर्वी प्रतिबंध करणार्‍या शहर पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांचीच टवाळखोरांनी धुलाई केली होती. तांबरी विभागात एका क्लासेसच्या समोर भर रस्त्यावर हा प्रकार घडला होता. दिल्ली येथील घटनेनंतर महिला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पोलिसांनी काही धोरणात्मक निर्णय घेण्यावर भर दिला आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबादच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.वैशाली कडूकर यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी शहरातील क्लासेस चालकांची नुकतीच बैठक घेतली. बैठकीत घेतलेल्या निर्णयाची शहरातील शाळा-महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
आठ कॅमेर्‍यांचे डे-नाइट लक्ष
जिजाऊ चौकात 8 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या कॅमेर्‍यांसाठी 50 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवण्यात येणार असून, त्याची किंमत 1 लाख रुपये आहे. या एकूण यंत्रणेसाठी 2 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सर्व क्लास चालक स्वत:च्या पैशातून ही यंत्रणा बसवणार आहेत. या सॉफ्टवेअर वापरासाठीचा कोड दिल्यास कोठेही लाइव्ह चित्रीकरण पाहता येईल. हे कॅमेरे चोवीस तास चौक आणि परिसराचे चित्रीकरण करतील.

पोलिस ठाण्यातूनही नियंत्रण
जिजाऊ चौक परिसरात गर्दीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे टवाळखोरीबरोबरच वाहनांचे अपघात, रस्त्यावर अतिक्रमण होत आहे. क्लासेस चालकांच्या पुढाकारातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास या प्रकाराला आळा बसू शकेल. अत्याधुनिक प्रणालीमुळे या कॅमेर्‍यांचे नियंत्रण क्लासेस तसेच पोलिस मुख्यालय किंवा पोलिस ठाण्यातूनही करता येईल, असे यशश्री क्लासेसचे चालक रवींद्र निंबाळकर यांनी सांगितले.

तिसर्‍या डोळ्याची मदतच...

सुरक्षेसाठी निर्णय
शहरातील टवाळखोरांची ठिकाणे असलेल्या भागांत विशेष पोलिस पथकाच्या कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळेही परिसरावर नजर ठेवणे शक्य होईल. त्यामुळे सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे.’’
डॉ.वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी,

शैक्षणिक परिसरावर लक्ष
असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक क्षेत्र असलेल्या भागांत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांकडून रीतसर परवानगी घेऊन क्लासच्या परिसरासह शैक्षणिक परिसरावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.’’
व्ही. एस. खोसे, जिल्हाध्यक्ष, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन

वर्षभरात 177 टवाळखोरांविरोधात कारवाई
उस्मानाबाद शहरात पथकाने वर्षभरात सुमारे 177 टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. काही मुली बदनामी, दादागिरीमुळे तक्रारी देण्यास धजावत नाहीत. मात्र, आता कॅमेर्‍यांमध्ये ही दादागिरी कैद होणार असून, कॅमेर्‍यांमुळे घटनांना पायबंद बसेल, अशी आशा पालकांनी व्यक्त केली.