आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Osmanabad Vot, Dr. Padmsingh Patil Vs Ravindra Gaikwad

उस्मानाबाद मतदारसंघ: डॉक्टर की सर... यंदाही कांटे की टक्कर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- अनेक तर्क-वितर्कांना फाटा देत अखेर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या फडात गतवेळचेच ‘मल्ल’ आमनेसामने आले आहेत. राष्ट्रवादीने खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना, तर शिवसेनेने प्रा. रवींद्र गायकवाड यांनाच पुन्हा रिंगणात उतरवले आहे. गेल्या वेळप्रमाणेच उभयतांमध्ये कांटे की टक्कर होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे रोहन देशमुखही बंडखोरीच्या तयारीत असल्यामुळे महायुतीला ते अडचणीचे ठरू शकतील. तसेच नाराज काँग्रेस नेतेही पद्मसिंहांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.

2009 च्या निवडणुकीत डॉ. पाटील आणि प्रा. गायकवाड यांच्यामध्ये थेट लढत झाली होती. तेव्हा अवघ्या 6,900 मतांनी गायकवाड यांचा पराभव झाला होता. मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाने पाटील यांना तारले होते. गतवेळचा अनुभव पाहता शिवसेनेने यंदा जागा मिळवायचीच या ईर्ष्येने गायकवाड यांना पुन्हा संधी दिली. उस्मानाबाद जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, त्याचप्रमाणे डॉ. पाटील यांचेही जिल्ह्यात चांगले वर्चस्व आहे.

संपर्काची नाळ तुटलेली
प्रा. गायकवाड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. मागील पराभवानंतर मात्र त्यांचा जनसंपर्क कमी झाल्याचे आता मतदारांनाही जाणवत आहे. ही कसर आता भरून काढताना त्यांची दमछाक होणार आहे. शिवसेनेसह भाजपमधील नाराज इच्छुक त्यांना कितपत साथ देतील, हा प्रश्नच आहे. जिल्ह्यात भाजपची ताकदही नगण्य आहे. त्यामुळे गायकवाड यांना त्यांच्यावरही फारसे विसंबून राहता येणार नाही.

‘तारणहार’ बार्शीकर नाराज
पवनराजे निंबाळकर खून प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून डॉ. पाटील यांचे नाव आहे. या प्रकरणात त्यांना तुरुंगवासही झालेला आहे. त्यामुळे त्यांची जनसामान्यांत गुन्हेगारी प्रतिमा आहे. तसेच गतवेळी राष्ट्रवादीला ज्या बार्शीने तारले होते, तेथील काँग्रेसचे नेते राजाभाऊ राऊत खासदारांवर नाराज आहेत. त्यामुळे बार्शीकर डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहतील का, हा प्रश्न आहे. या मतदारसंघात सुमारे पावणेदोन लाख मतदार आहेत. त्यामुळे यंदा बार्शीचाच उमेदवार हवा, अशी आग्रही मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यानुसार राऊत स्वत: निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या बंडखोरीचा राष्ट्रवादीला फटका बसू शकतो.

देशमुखांचा ‘धनी’ कोण?
भाजपचे सोलापुरातील माजी खासदार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन उस्मानाबादेतून अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांचा फारसा प्रभाव महायुतीवर पडण्याची शक्यता दिसत नाही. कारण, देशमुख यांचे जिल्ह्यात केवळ व्यावसायिक संबंध आहेत. या संबंधांचे मतांमध्ये रूपांतर करण्याचे त्यांना आव्हान असेल. जिल्ह्यातल्या भाजपमध्येही त्यांचे सख्य नाही. तरीही त्यांचा बोलविता धनी कोण आहे, यावर त्यांच्या मतांची संख्या ठरणार आहे. आम आदमी पक्षाचा जिल्ह्यात अजूनही तरी फारसा परिणाम दिसत नाही.

सोपल यांच्यावर भिस्त
खासदार डॉ. पाटील यांच्यावर नाराज असलेल्या बार्शीकरांनी डिजिटल होर्डिंग्जच्या रूपाने ‘आपण खासदारांना पाहिलंत का,’ अशी साद घातली होती. बार्शीमध्ये त्यांना राऊत यांनी मदतीचा ‘हात’ नाही दिला, तरी सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल यांना डॉ. पाटील यांच्यासाठी धावून जावे लागणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीचे गावपातळीपर्यंत मजबूत नेटवर्क आहे. त्याचाही डॉ. पाटील यांना फायदा होऊ शकतो. त्यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे.

डॉ.पद्मसिंह पाटील यांची बलस्थाने
एकदाही पराभव न पाहिलेला नेता. कार्यकर्त्यांची मजबूत फळी. स्थानिक स्वराज्य संस्थांवर स्वबळावर आणलेली सत्ता. शरद पवारांचे निकटवर्तीय असल्यामुळे केंद्रात मंत्रिपदाची शक्यता. धाडसी, अडलेले काम ताकदीने सोडवण्याची असलेली क्षमता.

उणिवा : पवनराजे निंबाळकर खून प्रकरणात सहभागाचा आरोप झाल्याने प्रतिमा मलिन, दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांचा अभाव. सत्ता असूनही अपेक्षित विकास न झाल्याने लोकांची नाराजी.

प्रा. रवींद्र गायकवाड यांची बलस्थाने
दोन वेळा आमदार. लोकांमध्ये मिसळणारा नेता म्हणून ओळख. लोहारा-उमरगा तालुक्यात वर्चस्व. सांप्रदायिक, धार्मिक कार्यात सहभाग. मागच्या वेळी निसटता पराभव.

उणिवा : गेल्या पराभवानंतर ‘नॉट रिचेबल’ झाल्याने कार्यकर्ते, लोकांत नाराजी. जिल्हाप्रमुखपद असूनही पक्षाचे मोठे कार्यक्रम नाहीत. गावपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी कमी वेळ. भाजपची ताकद नगण्य. शिवसेनेचीही संपूर्ण साथ मिळण्याबाबत साशंकता.