आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद जिल्ह्यात ११.५० मीटरने घटली पाणीपातळी, पाणी मुरवण्यावर द्यावा लागणार भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद -जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी ११.५० मीटरने घटली आहे. गतवर्षी आॅक्टोबरपासून पातळीमध्ये आठ मीटर घट नोंदवण्यात आली आहे. आता या वर्षी पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यात यश आले तरच भूजल पातळीमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. यासाठी पुनर्भरण करण्यावरही भर द्यावा लागणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील पर्जन्यमान घटल्यामुळे पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे. शेतातील पिकांना देण्यासाठी पिण्यासाठी भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला आहे. पर्यायाने जिल्ह्याच्या सरासरी भूजल पातळीत मोठी घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जमिनीतील पाण्याच्या होणाऱ्या उपशाच्या तुलनेत पाणी मुरवण्याचे प्रमाण अगदी नगण्य असल्यामुळे पातळीत घट होण्याचा क्रम सुरूच आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने मे महिन्यात भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या आहेत. यामध्ये जिल्ह्याची सरासरी पातळी ११.५० मीटरने घटली असल्याचे निदर्शनास आले आहे. गतवर्षीच्या आॅक्टोबरमध्ये एकूण सरासरी पातळी ३.८७ मीटर होती. यानंतर तीन महिन्यांच्या अंतराने म्हणजेच जानेवारीत पुन्हा पातळीच्या नोंदी घेण्यात आल्या, त्या वेळी ६.८७ मीटरने घट नोंदवण्यात आली. मार्चमध्येही जलपातळी घटण्याचा क्रम सुरूच होता. त्या वेळी ९.२५ मीटरने पातळी घटली आहे. आता मेमध्ये केलेल्या निरीक्षणानुसार पातळी ११.५० मीटरपर्यंत पोहोचली आहे. ऑक्टोबर ते मे पर्यंत पातळीमध्ये एकूण सात मीटरने सरासरी घट नोंदवण्यात आली. भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यात ४१ पाणलोट क्षेत्र अगोदरच निश्चित केले आहेत.

पाण्याचा बेसुमार उपसा
^गेल्याकाही वर्षांपासून पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. यामुळे जलसंकट ओढावले आहे. अाता यासंदर्भात काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आता यावर काहीच उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात आणखी परिस्थिती बिघडूशकते.'' पी. पी. रेड्डी, वरिष्ठभूवैज्ञानिक.

पावसाचे पाणी मुरवा
कूपनलिकेच्यामाध्यमातून शेकडो वर्षांपूर्वीचा जलसाठा उपसण्यात आला आहे. यामुळेही मोठे नुकसान झाले आहे. आता पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्याची गरज आहे. तसेच पुनर्भरणासारख्या योजनांवरही भर देण्याची आवश्यकता आहे. सर्वच स्तरावरून यासंदर्भात गांभीर्याने लक्ष दिले तरच भूजलपातळी भविष्यातील तरतूद म्हणून राखता येणार आहे.

अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी
महाराष्ट्रभूजल (विकास व्यवस्थापन) अधिनियम-२००९ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भर देण्यात येत आहे. २०० फुटांपेक्षा अधिक खोल कूपनलिका घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासाठी दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तरीही उपसा केल्याचे आढळल्यास दंड सहा महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, भूगर्भातील पाण्याचा उपसा उसासाठीच अधिक झाला आहे. एक हेक्टर उसासाठी लावणीपासून तोडणीपर्यंत २२० लाख लिटर पाण्याची गरज असते. उस्मानाबाद शहरातील नागरिकांना इतके पाणी आठवड्यापेक्षाही अधिक काळ पुरू शकते.

सरासरी पातळीची नोंद
सध्याजिल्ह्यात अनेक ठिकाणी कूपनलिका ८०० फुटांपर्यंत खाेदल्या जात आहेत. तरीही बहुतांश ठिकाणी पाणी लागत नाही. तसेच काही ठिकाणी अगदी १० फुटांवर पाणी लागले असल्याचे निदर्शास येते. यामुळे भूजल पातळीच्या नोंदीबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे या सर्व नोंदी एकूण सरासरीच्या असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील विविध भागात असलेल्या निरीक्षण विहिरींची नोंदी घेण्यासाठी उपयोग केला जातो.

परंडा तालुक्यात अधिक घट
जिल्ह्यामध्येपरंडा तालुक्यातील भूजल पातळीमध्ये अधिक घट नोंदवण्यात आली आहे. येथे ऑक्टोबरमध्ये ३.४८ मीटर पातळी होती. मात्र, आता यामध्ये नऊ मीटरने घट होत पातळी १२.५३ मीटरपर्यंत पोहाेचली आहे. यानंतर वाशी येथेही या प्रमाणात घट झाली आहे. त्यानंतर भूम, उमरगा, उस्मानाबाद, कळंब असा तालुक्यांचा क्रम आहे. सर्व तालुक्यांमध्ये कमी - अधिक प्रमाणात याच पद्धतीने जलपातळीमध्ये घट नोंदवण्यात आली आहे.