आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Over 2000 Shivsainik Bald Their Head Against Government

उस्मानाबादेत शासनाचे तेरावे, 2084 शिवसैनिकांचे मुंडण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- दुष्काळावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेल्या शासनाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुमारे 2084 शिवसैनिकांनी सहभाग नोंदवला.

उजनी पाणीपुरवठा योजनेचे काम तत्काळ पूर्ण करून योजना कार्यान्वित करावी, दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण केले. मुख्य रस्त्यावरच शामियाना उभारून मुंडण आंदोलनाची तयारी करण्यात आली होती. ब्रह्मवृंदांच्या हस्ते शासनाचा प्रतीकात्मक तेरावा घालण्यात आला. एका पुरोहिताने मंत्रोच्चार करून हा विधी केला. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, तालुकाप्रमुख अ‍ॅड. रामेश्वर शेटे, शहरप्रमुख राजाभाऊ घोडके, बाळासाहेब देशमुख, श्रीकांत देशमुख, पांडुरंग भोसले, मधुकर सावंत आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. विधीदरम्यान शिवसैनिकांनी शासनाच्या विरोधात बोंब ठोकली. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली. दुपारी जिल्हाप्रमुख प्रा. रवींद्र गायकवाड यांनी मुंडण आंदोलनात सहभाग घेतला. ग्रामीण भागातूनही शेकडो शिवसैनिक या आंदोलनासाठी दाखल झाले. तीनच्या सुमारास निवेदन देण्यासाठी पाचशेहून अधिक शिवसैनिक नगरपालिकेत गेले.

पोलिस निरीक्षकांसोबत वाद
मुंडण आंदोलनानंतर जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यासाठी जात असताना आंदोलकांना पोलिसांनी प्रवेशद्वारावर अडवले. यादरम्यान पोलिस निरीक्षक सुरेश घाडगे मोजक्याच व्यक्तींना आत जाण्याची परवानगी असल्याचे सांगत होते. हे सांगताना ते जिल्हाप्रमुखांना दरडावले. त्यामुळे जिल्हाप्रमुख गायकवाड यांचा घाडगे यांच्यासोबत वाद झाला.

चार दिवसांपासून तयारी
एकत्रितरीत्या केस कापून मुंडण आंदोलन करण्यासाठी शिवसेनेने चार दिवसांपासून तयारी केली होती. उस्मानाबादसह ग्रामीण भागातील शिवसैनिकांना या आंदोलनासाठी बोलावण्यात आले होते. खुर्चीवर बसवून 30 नाभिक मुंडण करीत होते. मुंडण करण्यापूर्वी शिवसैनिकांची नावे वहीमध्ये नोंदवण्यात आली.