आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवास्तव अपेक्षांमुळे विद्यार्थी वैफल्यग्रस्त, टाटा इन्स्टिट्यूटचे सर्वेक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - विद्यार्थिदशेत आत्महत्यांचे चिंताजनक प्रमाण लक्षात घेऊन टाटा इन्स्टिट्यूटने राज्यात सर्वेक्षण सुरू केले असून, आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणातून पालकांकडून अवास्तव अपेक्षा केल्या जात असल्यामुळेच विद्यार्थी वैफल्यग्रस्त बनत असल्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा सविस्तर अहवाल जून 2014 मध्ये शासनाला सादर करण्यात येणार आहे.

परीक्षेत नापास, वाढती स्पर्धा, मित्रांकडून होणारी हेटाळणी, गुरुजनांकडून मिळणारी अपमानास्पद वर्तणूक आदी कारणांमुळे विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याचे आजवर आढळून आले आहे. मात्र, सबंध महाराष्ट्राच्या तुलनेत आत्महत्यांचे प्रमाण राजधानी मुंबईमध्ये सर्वाधिक 5 टक्के असल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने आत्महत्येची कारणे आणि त्यावरील उपाययोजनांसाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (मुंबई) मदतीने राज्यात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चार जणांची समिती नियुक्त करण्यात आली असून, मुंबई, ठाण्यासह पुणे, नागपूर, जळगाव, धुळे, जालना, उस्मानाबाद, गोंदिया आदी 15 जिल्ह्यांत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. 9 वी, 10 वी, 11 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये जाऊन समिती संशोधन करीत आहे. विद्यार्थ्यांना पडलेले प्रश्न, पालकांकडून व्यक्त होणार्‍या अपेक्षा, मुख्याध्यापक, शिक्षकांचा अभिप्राय यानिमित्ताने विचारात घेतला जात आहे.


समितीत यांचा समावेश
‘टाटा’चे डॉ. शशिकांत सकट, रेखा रणदिवे, सुनीता कांबळे आणि मधुकर गायकवाड यांचा समितीत समावेश आहे.
सहा ते नऊ शाळांमध्ये सर्वेक्षण

विद्यार्थ्यांच्या तणावाची कारणे शोधणारी ही समिती राज्यातल्या 15 जिल्ह्यांत दौरा करीत आहे. त्यापैकी 8 जिल्हे पूर्ण झाले असून, पुढच्या टप्प्यात 7 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. काही जिल्ह्यांत 6 तर काही भागात 9 शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत सर्वेक्षण होत आहे. यामध्ये राज्यातून सरासरी 9 वी आणि 11 वीच्या 20 टक्के तर 10 वी आणि 12 वीच्या 30 टक्के विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येत आहे.


गरिबीमुळे आत्महत्या
महागडे शिक्षण आणि हलाखीची कौटुंबिक स्थिती यामुळे विदर्भातील गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे. राज्यातील काही शाळांमध्ये शिक्षकांकडून वेठबिगाराप्रमाणे अध्यापनाचे काम करून घेतले जात आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे तुटपुंज्या पगारात काम करणार्‍या शिक्षकांकडून गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो. परिणामी विद्यार्थी स्पध्रेत मागे राहतात. त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. त्यानंतर वैफल्यग्रस्त होऊन ते आत्महत्येचा मार्ग निवडतात, असे समितीच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.


शैक्षणिक पद्धतही कारणीभूत
विद्यार्थ्यांना परीक्षा काळातच नव्हे तर एरवीही तणाव येतो. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त बनतात. किचकट आणि डोक्याला प्रचंड ताण देणारी शैक्षणिक पद्धतही तणावाला कारणीभूत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे शैक्षणिक पद्धतीमध्ये काही प्रमाणात बदल सुचवण्यात येणार आहेत.


उपाय सुचवणार
शासन आणि टाटा संस्थेने नियुक्त केलेल्या आमच्या समितीचा अहवाल जूनच्या (2014) पहिल्या आठवड्यात शासनाला सादर करू. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या तणावासह आत्महत्यांची कारणे तसेच तणाव कमी करण्यासंबंधीच्या उपाययोजना सुचवणार आहोत. -डॉ. शशिकांत सकट, सर्वेक्षक