आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Over The Superstition Neighbour Set Fire Woman, Divya Marathi

करणीच्या संशयातून शेजा-यांनी तरुणीला पेटवून दिले, रुग्णालयात मृत्यूशी झुंज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव/ किल्लेधारूर - करणी, भानामती करते असा आरोप करत शेजा-यांनी १९ वर्षीय विवाहितेला पेटवून दिल्याची घटना तालखेड (ता. माजलगाव) येथे रविवारी रात्री घडली. यात ८० टक्के भाजलेली युवती मृत्यूशी झुंज देत आहे. यात आडस (ता. किल्लेधारूर) येथील भोंदूबाबाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तालखेड येथे नीता अशोक डोंगरे (१९) या विवाहितेला भेटण्यासाठी रविवारी तिचे आईवडील आले होते. ते पुन्हा गावी जाण्यासाठी निघाले. रात्री साडेसात वाजता त्यांना बसस्थानकावर सोडण्यासाठी नीताचे पती अशोक, सासरे, सासू गेले. नीता एकटीच घरी होती. ही संधी साधून शेजारी राहणारे प्रदीप गायकवाड आणि त्याची बहीण मधू गायकवाड घरात घुसले आणि नीताला मारहाण सुरू केली. त्यांच्याच घरातील रॉकेलचा कॅन प्रदीपने नीताच्या अंगावर ओतली, तर मधूने पेटवून दिले. यात ८० टक्के भाजलेल्या नीताला तालखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून तिला रात्री साडेबारा वाजता बीडला जिल्हा रुग्णालयात हलवले. सध्या नीता मृत्यूशी झुंज देत आहे.

या पीडित युवतीने उपचार सुरू असताना पोलिसांना जबाब दिला. मी करणी, भानामती करते, असा आरोप करून शेजारी राहणारे गायकवाड कुटुंबातील लोक छळ करत होते. यातून या बहीण-भावांनी मला पेटवून दिले, अशा तक्रारीवरून प्रदीप गायकवाड, मधू गायकवाड, सुषमा गायकवाड, देविनंदा गायकवाड व प्रदीप गायकवाड यांच्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

महिनाभरापासून सुरू होता वाद
करणी, भानामतीवरून गायकवाड कुटुंबीय व डोंगरे कुटुंबीयांत महिनाभरापासून वाद सुरू होता. नीता या करणी करत असल्याने गायकवाड कुटुंबीयातील महिलांच्या साड्यांना छिद्र पडत असल्याचे गायकवाड कुटुंबीयांचे म्हणणे होते. यातूनच रविवारी नीता यांना पेटवून देण्यात आले.