आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paid News: Notice Issued To Rajenimbalkar, Ranajagjit Singh, Dudhgaonkar

पेड न्यूजप्रकरणी उस्मानाबादचे आमदार राजेनिंबाळकर, राणाजगजितसिंह, दुधगावकरांनी नोटिसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - विधानसभा निवडणुकीतील उस्मानाबाद मतदारसंघाचे उमेदवार आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील व संजय पाटील दुधगावकर या तीन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना जिल्हा माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण समितीने पेडन्यूज प्रकरणी नोटीस बजावली आहे. याप्रकरणी ४८ तासांमध्ये खुलासा करण्यास बजावण्यात आले आहे.

उस्मानाबाद मतदारसंघामध्ये अटीतटीची निवडणूक होत आहे. सर्वच उमेदवार प्रचारामध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. काही उमेदवार प्रचाराचा भाग म्हणून वृत्तपत्रांचा आधार घेत आहेत. यामध्ये शिवसेनेचे राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटील तर भाजपचे दुधगावकर पेड न्यूजच्या कचाट्यात अडकले आहेत. त्यांनी काही वृत्तपत्रांमध्ये छापण्यासाठी दिलेल्या मजकुराचा हिशेब दिला नसल्याचा ठपका यामध्ये ठेवण्यात आला आहे. जिल्हा माध्यम संनियंत्रण व माध्यम प्रमाणीकरण समितीकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रांमधील बातम्यांचा बारकाईने अभ्यास करण्यात येत आहे.

समितीने पाहणी करत असताना वृत्तपत्रांमध्ये बातमी स्वरूपात छापलेला काही मजकूर एकांगीपणाचा असल्याचे आढळले आहे. या मजकुराबाबत तिन्ही उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या निवडणुकीच्या हिशेबात समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे ही नोटीस देऊन खुलासा मागवण्यात आला आहे.

प्रत्यक्ष कर्मचा-यांमार्फत या नोटिस पाठवण्यात आल्या असून नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांमध्ये याप्रकरणी उत्तर देण्यास बजावण्यात आले आहे. राणा पाटील यांना तीन पेड न्यूजबाबतच्या नोटिस असून राजेनिंबाळकर व दुधगावकर यांना प्रत्येकी एक नोटीस देण्यात आली आहे.

सोशल मीडियावरही मजकूर
सामाजिक संकेतस्थळे (सोशल मीडिया ) व व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्सवर प्रचाराचा मजकूर प्रसिद्ध करत असताना जिल्हा माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण समितीकडून तो मजकूर प्रमाणित करणे आवश्यक आहे. मात्र, आमदार राजेनिंबाळकर यांनी मजकूर प्रमाणीकरण न करताच फेसबुकवर प्रचारासाठी प्रसिद्ध केला आहे.

अपात्रतेची कु-हाड
संबंधित वृत्तपत्रांच्या निर्धारित केलेल्या दरानुसार पेड न्यूजचे मूल्य ठरवण्यात येणार आहे. पेड न्यूजचे मूल्य व उमेदवारांचा अन्य खर्च निवडणूक आयोगाने ठरवलेल्या खर्चाच्या रकमेपेक्षा अधिक झाल्यास उमेदवारावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.