आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळातून सावरण्याचे मागितले बळ, लाखोंनी घेतले एकनाथांचे दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ-मृदंगाच्या निनादात संत एकनाथांच्या भजनात तल्लीन होऊन मराठवाड्यातील लाखो भाविकांचा जनसागर पैठण येथे संत एकनाथांच्या दरबारी रविवारी उसळला. निमित्त होते कार्तिकी एकादशीचे. संत एकनाथांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी झाली. दुष्काळच्या परिस्थितीने हैराण करून सोडलेल्या मराठवाड्यासह विदर्भातील भाविकांनी संत एकनाथांच्या दरबारी येऊन डोक्यावर घोंगवणाऱ्या दुष्काळाच्या सावटातून सावरण्याचे बळ देण्याचे साकडे घातले. या वेळी जयघोषणांनी मंदिराचा परिसर दणाणला.
कार्तिक एकादशीच्या औचित्यावर शहरातील संत एकनाथ महाराजांचे समाधी मंदिर व नाथांच्या वाड्यातील पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. एक लाखावर भाविकांनी भजन म्हणत संत एकनाथांचे दर्शन घेतल्याचे संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नंदलाल लाहोटी यांनी सांगितले.
कार्तिकी एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरला जातात. ज्या भाविकाना पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता आले नाही, असे लाखो भाविक "तूच आमुचा पांडुरंग' म्हणत आजच्या कार्तिक एकादशीच्या दिवशी पैठणच्या संत एकनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी दक्षिणकाशीमध्ये दाखल झाले. अपार भक्तीभावाने आपल्या लाडक्या संत एकनाथांच्या समाधीवर पुष्प, हार अर्पण करून माथा टेकवला. दरम्यान, टाळ, मृदंगाच्या निनादामध्ये भजन, कीर्तनाबरोबरच संत एकनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर माउली की जय, पांडुरंग पांडुरंगाच्या जयघोषात पैठण नगरीचा आसमंत दुमदुमून गेला.
गोदाकाठी जमला मेळा
नाथ समाधी मंदिराच्या मागचा गोदाकाठ रविवारी गर्दीने फुलून गेला. दोन्ही नाथ मंदिर परिसरात पोलिस निरीक्षक सी. पी. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. आमदार नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, रेखाताई कुलकर्णी, नंदलाल लोहाटी, दिलीप मगर, मधुकर काळे, महेश खोचे आदींनी दर्शन घेतले.
पांडुरंगाला दुग्धाभिषेक
गावातील नाथ मंदिरात रघुनाथ महाराज गोसावी, योगेश पालखीवाले, रविगुरू साळजोशी, श्रीकृष्ण कुलकर्णी, हरिभाऊ जोशी, रामभाऊ गोपवाडकर यांच्या हस्ते विजयी पांडुरंगाच्या मूर्तीला मंत्रोच्चारात दुग्धाभिषेक करण्यात आला. या मंदिरात हरिजागर उत्सवास सुरुवात झाली.
प्रतिष्ठापनेला ५०९ वर्षे
संत एकनाथांचे पणजोबा भानुदासबुवा यांनी कर्नाटकाच्या कृष्णदेवराय यांच्याकडून विजयी पांडुरंगाची मूर्ती कार्तिकी एकादशीच्या दिवशीच आणली होती. त्या मूर्तीची पंढरपूरला पुन्हा प्रतिष्ठापना केल्याची आख्यायिका आहे. या घटनेला ५०९ वर्षे पूर्ण झाली. भगवानबाबांच्या मठात रविवारी दिनेश पारीकांचे प्रवचन झाले.
आज तुळशी विवाहाची तयारी
कार्तिकीपासून ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशीचा विवाह विधी करण्याची प्रथा आहे. तुळशी विवाहनंतरच विवाह मुहूर्त ठरलेले असतात. हिंदू धर्मियांनी तुळशी विवाह साजरा करावा. तुळशी विवाहसाठी तालुक्यात तयारी झाल्याची माहिती पुरोहित सुयश शिवपुरी यांनी दिली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..