आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठण एमआयडीसीतील कंपन्या रात्रीला हवेत सोडतात घातक वायू; 15 गावांना त्रास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठण एमआयडीसीतील बहुतांश कंपन्यांकडून रात्रीच्या वेळी घातक वायू हवेत सोडला जात असल्याचा परिसरातील १० ते १५ गावांतील लोकांना श्वसनाचे त्रास वाढत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पैठण औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्यांकडून घातक वायू प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे लक्ष नसल्याने थेट कोणतीही प्रक्रिया न करता जमिनीत सोडले जात असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. येथील केमिकल कंपन्यांलगतच्या जमिनी या नापीक झाल्या असून परिसरातील विहिरीचेही पाणी दूषित होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
 
या गंभीर बाबीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ पाहण्याची भूमिका घेत असतानाच महिन्याभरात येथील काही कंपन्यांकडून रात्री घातक वायू हवेत सोडला जात आहे. परिसरातील जायकवाडी, पिंपळवाडी, राहुलनगर, कारखाना, गणेशनगर, वाहेगाव, नारायणगाव, मुधलवाडी येथील नागरिकांत कोठे गॅस गळती झाली की काय याची विचारणा नागरिक एकमेकांना करत होते. मात्र, रात्री १० नंतर कंपन्या  घातक वायू हवेत सोडत असल्याची बाब समोर आली अाहे. हा वायू शरीराला हानिकारक असल्याने त्यावर प्रक्रिया न करता तो हवेत सोडण्यात येत असल्याने श्वसनाचे विकार होण्याचा धोका या परिसरात निर्माण झाला आहे.

प्रदूषण मंडळाचे कंपन्यांकडे दुर्लक्ष  
कंपनीत काम करणाऱ्या अनेक मजुरांना आपला जीव सुरक्षेअभावी गमवावा लागला असताना प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून मात्र प्रदूषण धोक्यात आणणाऱ्या केमिकल कंपन्यांवर कारवाई का करत नाही, असा प्रश्न पर्यावरण अभ्यासकांकडून उपस्थित होत आहे.

परिसरातील मुलांवर होतील परिणाम 
कंपन्यांनी केमिकलयुक्त घातक वायू सोडण्यापूर्वी त्याच्यावर प्रक्रिया करावी.  लहान मुलांना आतापासूनच श्वसनाचे त्रास वाढण्याची शक्यता आहे - डॉ. पंडित किल्लारीकर, पैठण.

उग्र वासाने नागरिक झाले हैराण  
रात्री कंपन्या घातक वायू हवेत सोडत आहेत. या सोडलेल्या वायूच्या उग्र वासामुळे परिसरातील लोक हैराण झाले असून याचा परिणाम लहान मुलांवर होत आहे. संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी - राजेंद्र गिऱ्हे, नागरिक, राहुलनगर, पैठण.

वायूमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण   
रात्री कंपन्यांतून घातक वायू हवेत सोडला जात आहे, यावर कंपन्यांनी प्रक्रिया करावी. या वायूमुळे नागरिकांत भीतीचे वातावरणात निर्माण होत आहे. 
- साईनाथ सोलाट, सरपंच, पिंपळवाडी पैठण

कंपन्यांना आम्ही सूचना करतो
पैठण एमआयडीसीत चार ते पाच केमिकलच्या कंपन्या आहेत. यातून प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचे दिसते. मात्र, प्रदूषण कमी झाले पाहिजे याची उपाययोजना संबंधित कंपन्यांनी करावी, अशा सूचना आम्ही करतो व त्याचा अहवाल शासनाकडे पाठवत असतो.- जे. एस. कदम, उपकार्यकारी अभियंता, प्रदूषण मंडळ, औरंगाबाद
 
बातम्या आणखी आहेत...