आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथषष्ठी सोहळा : दिंड्या तेवढ्याच, वारकरी रोडावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - यंदा नाथषष्ठीनिमित्त नाथनगरीत येणार्‍या वारकर्‍यांची संख्या 40 टक्के घटल्याचे चित्र आहे. पिके हातात येण्याच्या वेळी अवकाळी पाऊस व गारपिटीने दगाफटका केल्याने शेतकरी पूर्ण खचला असून तो यंदा दिंडीत सहभागी होण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे वारकर्‍यांच्या घटलेल्या संख्येवरून दिसून आले.

दरवर्षी नाथनगरीत सुमारे 500-550 दिंड्या दाखल होतात. यंदाही 540 दिंड्या दाखल झाल्याची नोंद प्रशासनाकडे असली तरी दिंड्यांमधील वारकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. वारकरी संप्रदायात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाचा समावेश आहे. नाथषष्ठीनिमित्त पैठण येथे मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातून दिंड्या येतात. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकर्‍यांना फटका दिला असला, तरी मराठवाड्यातील शेतकर्‍यांना सर्वाधिक फटका बसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. दिंड्यांमधून फेरफटका मारताना सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर येथील मधुकर महाराज पारनेरकर यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, गारपिटीचा सर्वाधिक फटका सिल्लोड तालुक्याला बसला. त्यामुळे दिंडीतील वारकर्‍यांची संख्या घटली आहे. गतवर्षी दिंडीत 200 ते 300 वारकरी होते. यंदा ही संख्या 100 वर आली आहे. संख्या कमी असली तरी परंपरेनुसार दिंडी काढावी लागते, असे त्यांनी सांगितले. तसेच गतवर्षीप्रमाणेच यंदाही येथे पाण्याची प्रचंड टंचाई आहे.

वारकर्‍यांना पहाटे 3 वाजता उठून अंघोळ करून काकडा आरती करावी लागते; परंतु प्रशासन सकाळी 6 वाजता पाणी सोडत असल्याने वारकर्‍यांना अडचण होत आहे, तर परिसरात पोलिस बंदोबस्तही नसल्याने सामानाची देखरेखही करावी लागते.

अशा अनेक दिंडीप्रमुखांशी संपर्क साधला असता सर्वांनी वारकर्‍यांची संख्या घटल्याचे सांगितले, अनेक वारकरी नाथांचे दर्शन करून लगोलग परतल्याचे दिंडीप्रमुखांनी सांगितले.

संख्या निम्म्यावर
हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे यंदा दिंडीत येणार्‍या वारकर्‍यांची संख्या घटली आहे. दरवर्षी दिंडीत 300 वर वारकर्‍यांचा सहभाग असतो. यंदा ही संख्या निम्म्यावर आली आहे. - मगन महाराज, दिंडीप्रमुख, केकत पांगरी, ता. गेवराई

माझ्या चिकूच्या बागा होत्या. झाडाला ना पान, ना फळ अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गारपिटीने सतत पंधरा दिवस पिच्छा सोडला नाही. निसर्ग कोपल्याने गतवर्षी दुष्काळ व यंदा अवकाळी पावसाने सर्व हिरावले; परंतु यातून सावरत आम्ही पुन्हा दिंडीत सहभागी होऊन नाथचरणी आलो. - तुकाराम दौड, वारकरी, पानवडोद

यंदा दिंड्यांची संख्या गतवर्षी एवढीच म्हणजे 540 आहे; परंतु अनेक ठिकाणी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने दिंड्यांतील वारकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. आज काल्यानिमित्त विश्वस्त मंडळाकडून दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी अनेक सेवाभावी संस्थांची मदत मिळत आहे. - नंदलाल लाहोटी, विश्वस्त, नाथमंदिर