आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथषष्ठीचे अनुदान दुपटीने वाढले, मिळणार सव्वाकोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - दक्षिणकाशी पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रोत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांना शुद्ध पाणी, फिरते मोबाइल शौचालय, महिलांना स्नान करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थांसह अन्य सुविधा पुरवण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने यंदा ५० लाखांहून आता एक कोटी २५ लाख रुपयांच्या अनुदानात वाढ करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.   
 
यंदाच्या नाथषष्ठी यात्रोत्सवाला येत्या १८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यानिमित्त मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी व नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नगरपालिकेच्या वतीने यात्रोत्सवात पुरवल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आणि करावयाच्या उपाययोजनांविषयी माहिती दिली.  नाथषष्ठी यात्रोत्सवात सात ते आठ लाख भाविक येणार असून त्यांच्या सुविधांकडे विशेष लक्ष नगरपालिका देणार आहे. 

या वेळी मुख्याधिकारी  सूर्यवंशी यांनी सांगितले की, यंदाच्या नाथ यात्राेत्सवासाठी शासनाकडून वाढीव अनुदान मिळणार असून भाविकांना स्वच्छ पाणी, फिरते मोबाइल शौचालयाची सुविधा देण्यात येणार आहे. गोदावरी नदी पात्रातील पाणी पुन्हा धरणात सोडले जात असून नदी पात्र कोरडे करण्यास सुरुवात केल्याचे  सांगितले. पत्रकार परिषदेला  नगरसेवक प्रकाश वानोळेंसह पालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
दिंडीच्या फडांवर प्रत्येकी एक टँकर : दिंडीच्या फडांवर प्रत्येकी एक पिण्याच्या पाण्याचे टँकर दिले जाणार आहे. नव्याने दाखल होणाऱ्या दिंड्यांनाही पालिका जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात्रा मैदान परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अतिरिक्त सफाई कामगारही असणार आहेत. भाविकांना सोयीसुविधा पुरवण्यास मुख्याधिकारी, नगरसेवक व पालिकेचे अधिकारी, कर्मचारी तत्पर राहतील, असे  नगराध्यक्ष लोळगे यांनी या वेळी सांगितले. तसेच नव्याने येणाऱ्या दिंड्यांनाही न.प. जागा उपलब्ध करून देईल.

नगरपालिकेकडून कामाला सुरुवात   
नाथषष्ठी यात्रोत्सवास लाखो वारकरी नाथ नगरीत दाखल होऊन गोदावरी नदीतील वाळवंटात व शहरात  फड टाकून भजन, कीर्तन व प्रवचनासारख्या धार्मिक कार्यक्रमातून नाथ भक्तीत तल्लीन होत असतात. या वारकऱ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी, दिंडी स्थळ,  यात्रा मैदान व गोदावरी नदीतील वाळवंट स्वच्छ करण्यासाठी पालिकेने आतापासूनच नियोजनबद्ध काम करण्यास सुरुवात केली आहे.
बातम्या आणखी आहेत...