आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंडितअण्णांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची परळीत जय्यत तयारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - विधानसभा निवडणुकीपासून खदखदणारा असंतोष परळीच्या नुकत्याच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उफाळून आला आणि पुतण्याच्या बंडाने काकांना आव्हान दिल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर वेग आलेल्या राजकीय घडामोडीत आता भाजपला मोठा धक्का बसणार हे स्पष्ट दिसत असून खासदार गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू तथा आमदार धनंजय मुंडे यांचे वडील पंडितअण्णा मुंडे आणि सहकारी 19 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होत आहे.
मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील तोतला मैदानावर भव्य मंडप उभारणी तसेच कमानी व बॅनर बांधण्याचे काम शहरभर चालू आहे. तालुक्यातील प्रमुख मार्गांवरही कटआऊट लागत असल्याने किती जणांचा प्रवेश होणार याची उत्कंठा लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होणार आहे. जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सीअण्णा सिरसाट, पंचायत समितीचे सभापती अ‍ॅड. गोविंद फड, उपसभापती विष्णुपंत देशमुख, नगराध्यक्ष दीपक देशमुख हेदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत तसेच तालुक्यातील सेवा सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष, सरपंच, संत जगमित्र सूतगिरणीचे संचालक, बाजार समितीचे संचालकही या वेळी राष्ट्रवादीत प्रवेश करतील. प्रवेश सोहळा देखणा करण्यासाठी आमदार धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत. नांदेड येथील सहयोग मंडपला हे काम देण्यात आले असून 15 जानेवारीपासून मंडपाच्या उभारणीसाठी दीडशे कामगार दिवस-रात्र काम करीत आहेत. 250 बाय 350 जागेत जमिनीपासून 25 फूट उंचीचा मंडप उभारला जात आहे. परभणी येथील मंडपवाल्याकडून कमानींचे काम होत आहे. सर्व प्रमुख रस्त्यांवर दोनशे फूट अंतरावर तब्बल 70 कमानी उभ्या करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. होर्डिंग्ज बनवण्याचे कामही होत आहे. सर्वच प्रकारच्या कामांची लगबग सुरू झाली असून त्यावर सुमारे 200 कामगार, एक क्रेन, 3 ट्रक व 5 ऑटोंचा वापर होत आहे.
बंडामुळे राष्ट्रवादीचा झेंडा - तालुक्यात भाजपचीच सत्ता होती. ग्रामपंचायतीत एखादा अपवाद वगळता भाजपचीच सत्ता होती, परंतु आमदार धनंजय मुंडेंंच्या बंडामुळे नगर परिषद, बाजार समिती, तालुका खरेदी-विक्री संघ, संत जगमित्र सूतगिरणीसह सोसायट्या व ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार आहे.
भविष्यात ताकद दिसेल - 19 जानेवारीला मी व माझे सहकारी कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. अद्यापपर्यंत तरी मी भाजपचाच आहे. आमच्यासोबतचे सर्व संबंध तोडल्याचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केल्याने आमचा नाइलाज आहे. आमची ताकद भविष्यात दिसेल.’’ - पंडितअण्णा मुंडे, ज्येष्ठ नेते, भाजप, परळी