आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्हा परिषदेसाठी मुंडे बहीण-भावाची प्रतिष्ठा पणाला, संख्याबळाची जुळवाजुळव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - बीड जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या दोघांकडून संख्याबळाची जुळवाजुळव सुरू झाली आहे. भाजप व राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येकी तीन सदस्यांची गरज असल्याने राष्ट्रवादीतील बंडखोर संदीप क्षीरसागर यांच्या काकू-नाना विकास आघाडीवर जिल्हा परिषदेच्या सत्तेचे गणित अवलंबून आहे.  
 
बीड जिल्ह्यातील सहापैकी पाच मतदारसंघांत भाजपचे आमदार, एक ग्रामविकासमंत्री असतानाही भाजपला ६० पैकी केवळ १९ जागा मिळवता आल्या. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना त्यांच्या परळी मतदारसंघात एकही जागा मिळवता आली नाही. १९ संख्याबळ असलेल्या भाजपकडे गोपीनाथ मुंडे संघर्ष विकास आघाडीचा एक सदस्य असून भाजपचे एकूण संख्याबळ २० होते, तर  शिवसेनेकडे माजी आमदार  बदामराव पंडित गटाचे ४, भारतीय संग्राम परिषदेचे आमदार विनायक मेटे यांच्याकडे चार जागा आहेत. ही आकडेजोड २८ वर पोहोचते. परंतु मुंबई महानगरपालिकेत जर युती झाली तरच बीड जिल्हा परिषदेत युतीचे भवितव्य अवलंबून आहे. 

भाजपला आणखी तीन सदस्यांची गरज आहे. यासाठी भाजप  सध्या एक अपक्ष, एक काँग्रेस व एक राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन सदस्यांच्या संपर्कात आहे. दुसरीकडे आमदार विनायक मेटे  यांनी मुंबईत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेत  दोघांतील कटुता संपवली.
 
परंतु जर तुमची समीकरणे जुळत असतील तर आम्ही तुमच्याबरोबर राहू, असा सूचक इशाराही पंकजा यांना  दिल्याचे समजते. त्यामुळे भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता आणण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरस्कृत सदस्यासह २५ संख्याबळ असून काँग्रेसचे तीन सदस्य असे एकूण २८ संख्याबळ आहे. काकू-नाना विकास आघाडीचे संदीप क्षीरसागर यांचे तीन सदस्य जर राष्ट्रवादीकडे आले तरच राष्ट्रवादीची झेडपीत सत्ता येऊ शकते. परंतु त्या बदल्यात संदीप यांच्या आई रेखा क्षीरसागर यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद द्यावे लागणार आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे  संदीप यांच्या संपर्कात आहेत. परंतु संदीप यांना राष्ट्रवादीने बरोबर घेऊ नये म्हणून त्यांचे मोठे काका विरोध करत आहेत. 

मंगला सोळंके अध्यक्षपदाच्या दावेदार   
जिल्ह्यात  राष्ट्रवादीत २४ पैकी नऊ जागा माजी मंत्री प्रकाश साेळंके यांच्या गटाकडे आल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सोळंके यांच्या पत्नी मंगला सोळंके याच प्रबळ दावेदार आहेत; परंतु दुसरीकडे केज तालुक्यातील धनंजय मुंडे यांच्या गटाचे विद्यमान सभापती बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका यांच्याही नावाची चर्चा आहे.   
बातम्या आणखी आहेत...