आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवानगड वादात अखेर पंकजा मुंडे बॅकफूटवर! म्हणाल्या, मी नको असेन तर राम शिंदेंना पाठवते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरूर कासार- दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री   यांच्यातील वादात आता  पंकजा बॅकफूटवर आल्या आहेत. ‘मी लहान आहे, नमते घेण्याची माझी तयारी आहे. गडाच्या विकासासाठी विश्वस्तांनी मदत करावी, मी गडावर नको असेन तर मंत्री राम शिंदेंना गडावर पाठवते,’ असे वक्तव्य त्यांनी शिरूर तालुक्यातील वारणी येथे गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाच्या समाराेपावेळी मंगळवारी केले. विशेष म्हणजे या वर्षी भगवानगडाच्या नारळी सप्ताहाचे निमंत्रण ‘गडाच्या लेकी’ला नव्हते.  
 
पंकजा म्हणाल्या, भगवानगड, नारायणगड, गहिनीनाथगड ही उद््बोधक क्षेत्रे आहेत. भगवानगडाच्या विकासासाठी मी प्रयत्न करत आहे. त्यासाठी विश्वस्त मंडळाने सहकार्य करावे. मी नको असेन तर माझे प्रतिनिधी त्या जिल्ह्यातील मंत्री राम शिंदे, आमदार मोनिका राजळे यांना गडावर पाठवते त्यांच्याशी विश्वस्तांनी चर्चा करावी.  जर काही झाले असेल तर मी एक पाऊल मागे यायला तयार आहे.

भगवानगडावर दसरा मेळावा घेण्याला महंत नामदेवशास्त्रींनी विरोध केल्यानंतर पंकजा मुंडे, नामदेव शास्त्री यांच्यातील वाद राज्यभर गाजला होता. पंकजांनी गडाच्या पायथ्याला मेळावा घेतला तर नामदेवशास्त्रींनीही गडाच्या कार्यक्रमात राजकारिणी नको म्हणत यावर्षी आष्टी तालुक्यातील बावीमध्ये झालेल्या भगवानगडाच्या सप्ताहाला मुंडेंना निमंत्रित केले नव्हते. दुसरीकडे नारायणडाच्या विकासासाठी 25 कोटींचा निधी मंजूर करून नारायणगडच्या सप्ताहात त्यांनी आई वडील रागावल्यास नातवं आजोबांकडे येतात, असे सांगत आपण ‘नारायणगडाची नात’ असल्याचे सांगितले होते. शिरूर तालुक्यातील वारणी येथे गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहात मंगळवारी समारोपाला त्यांनी हजेरी लावली. या वेळी बोलताना मुंडे म्हणाल्या,  भगवानगड, नारायणगड, गहिनीनाथगड ही उद‌्बोधक क्षेत्रं आहेत.मला सर्व गडांचा विकास करायचा आहे. नारायण गडासाठी 25 कोटी दिले, गहिनीनाथ गडासाठी 37 कोटींचा निधी मिळवला. भगवानगडाच्या विकासासाठीही मी प्रयत्न करत आहे. गडावर होणाऱ्या विकासकामांसाठी विश्वस्त मंडळाने सहकार्य करावे. मी नको असेल तर माझे प्रतिनिधी त्या जिल्ह्यातील मंत्री राम शिंदे, आमदार मोनिका राजळे यांना गडावर पाठवते त्यांच्याशी विश्वस्तांनी चर्चा करावी. भगवानगडाच्या विकासाचा कृती आराखडा तयार आहे. जर काही झाले असेल तर मी एक पाऊल मागे यायला तयार आहे.
 
गडाच्या विकासासाठी नमते घेण्याची आपली तयारी आहे. भगवानगडाचा विकास करण्याचे सर्व प्रयत्न करणार आहे. येत्या अडीच वर्षांच्या काळात तीनही गडांचे चित्र पालटायचे असल्याचे ते म्हणाले. या वेळी  गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज, आ.  भीमराव धोंडे, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, समाजकल्याण सभापती संतोष हंगे, सर्जेराव तांदळे, संदीप क्षीरसागर, जि. प. सदस्या सविता बडे, सतीश शिंदे, रामराव खेडकर, जयदत्त धस, पं. स. सभापती राणी बेदरे, सोमनाथ खेडकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांची उपस्थिती होती. हजारो भाविकांची उपस्थिती होती.
 
पंकजांचा विशेष सत्कार
गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी 37 कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल पंकजा मुंडे यांचा महंत विठ्ठल महाराज यांनी विशेष सत्कार करून गडाच्या वतीने त्यांचे आभार मानले.  
 
आईचे प्रेम दायीला नसते...  
आईचे प्रेम दायीला कधी कळत नसते, या उक्तीप्रमाणे बाहेरच्या नेतृत्त्वाला बीडची माया कधीच येणार नाही. डझनभर आमदार जिल्ह्याला देणाऱ्या नेतृत्त्वाने जिल्ह्यात विकासाची, सिंचनाची कामे केली असती तर आज ही वेळ आली नसती असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधला.
बातम्या आणखी आहेत...