आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमधून निवडून यायचेय, तिथे जास्त लक्ष, लातूरमध्ये पंकजा मुंडे यांची स्पष्ट कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - बीड जिल्ह्यात माझे मतदार आहेत. तिथून मला निवडून यायचे असते. त्यामुळे लातूर आणि बीड अशी दोन जिल्ह्यांची पालकमंत्री असले तरी मला बीडकडे जास्त लक्ष द्यावे लागते, अशी स्पष्ट कबुली पंकजा मुंडे यांनी लातूरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने त्या सोमवारी लातूरमध्ये आल्या असता पत्रकारांनी त्यांना बोलते केले.

लातूर शहर तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात असताना एखाद्याकडे हक्काने तक्रार करावे असे कुणीच नाही. पालकमंत्री या नात्याने तुम्ही येणे अपेक्षित असतानाही तुम्ही चार-चार महिने लातूरकडे फिरकत नाही, हे लातूरकरांचे गाऱ्हाणे पत्रकारांनी मांडल्यानंतर पंकजा मुंडेंनी लातूरची अकॅडमिक कामे मी कधीही अपूर्ण ठेवत नाही. पालकमंत्री या नात्याने जेवढी कर्तव्य मी करायची आहेत ती मी पार पाडत आहे. त्यात कुचराई केलेली नाही. मात्र, बीडला मतदार असल्यामुळे तिथे जास्त वेळा जावे लागते, असे त्या म्हणाल्या.

१५४ कोटींचा आराखडा
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लातूर जिल्ह्यासाठी येत्या अार्थिक वर्षासाठी १५४ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. गेल्यावर्षीचा अखर्चित निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना दिल्या अाहेत. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार ३ तारखेला मराठवाड्यातील जिल्हा आराखड्यांचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी काळात लातूर टँकरवरच अवलंबून लातूरला आगामी काळात टँकरद्वारेच पाणी द्यावे लागणार आहे. उजनी, माकणी या योजना कायमस्वरूपी स्वरूपाच्या आहेत. तूर्त शहराला टँकरने पाणी देण्याशिवाय पर्याय नाही. लातूरकरांनी पाणी जपून वापरावे. उजनी धरणातील पाणी लातूरला येणार हे मी खूप वर्षांपासून ऐकत आहे. त्याबाबत आमचे सरकार सकारात्मक आहे. मात्र, ती कधी पूर्ण होईल हे आत्ता सांगता येणार नाही. मात्र, शहराला गरज पडलीच तर रेल्वेनेही पाणी आणावे लागेल. तूर्त तरी धनेगाव धरणातील पाणी पुरवून महिनाभर वापरावे लागेल. त्यानंतर साई, भंडारवाडी, डोंगरगाव, माकणी धरणातील पाणी टँकरद्वारे दिले तर ऑगस्टपर्यंतची सोय होईल, असे नियोजन असल्याचे त्या म्हणाल्या.